BJP MP Girish Bapat Died: भाजपाचे पुण्यातील खासदार गिरीश बापट यांचं निधन झालं आहे. ते ७२ वर्षांचे होते. प्रकृती अस्वास्थ्यामुळे गेल्या दीड वर्षांपासून त्यांच्यावर पुण्यातील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र, त्यांची प्राणज्योत मालवल्याची माहिती समोर आली आहे. गिरीश बापट यांच्यावर संध्याकाळी सात वाजता वैकुंठ स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहे, अशी माहिती जगदीश मुळीक यांनी दिली आहे. गिरीश बापट यांच्यामागे पत्नी, मुलगा, सून आणि नात असा परिवार आहे.

“ते एका योद्ध्याप्रमाणे लढले”

“आजचा दिवस अत्यंत वाईट आहे. अत्यंत दु:खद अशी घटना आज घडली आहे. भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि पुण्याचे माजी खासदार गिरीश बापट यांचं काही वेळापूर्वी निधन झालंय. गेल्या दीड वर्षांपासून ते रुग्णालयात उपचार घेत होते, आजाराशी झुंजत होते. ते अत्यंत झुंजार असे व्यक्तिमत्व होते. एका योद्ध्याप्रमाणे ते लढले. पण आज त्यांची झुंज थांबली”, अशी प्रतिक्रिया जगदीश मुळीक यांनी दिली.

shikrapur jategaon robbery marathi news, shikrapur robbery marathi news
पुणे: शिक्रापूर परिसरात दरोडा; ज्येष्ठ महिलेचा खून
Former Pune Mayor Mohan Singh , Former Pune Mayor Mohan Singh Rajpal Passes Away, former pune mayor passed away, marathi news, pune news, pune former ncp mayor Mohan Singh,
माजी महापौर मोहनसिंग राजपाल यांचे दीर्घ आजाराने निधन
kolhapur, crematorium
कोल्हापूरकरांचे असेही दातृत्व; स्मशानभुमी दानपेटीत २ लाखांवर देणगी जमा
Sharad Pawar NCPs Kolhapur District Youth President Nitin Jambhale passed away
शरद पवार राष्ट्रवादीचे कोल्हापूर जिल्हा युवा अध्यक्ष, इचलकरंजीचे माजी नगरसेवक नितीन जांभळे यांचे निधन

कसबा पोटनिवडणुकीसाठी प्रचारात दिसले होते गिरीश बापट

गिरीश बापट गेल्या दीड वर्षांपासून आजाराशी झुंजत होते. त्यांच्यावर उपचारही चालू होते. मात्र, तरीदेखील कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत गिरीश बापट एका मेळाव्यात सहभागी झाले होते. त्यावरून विरोधकांनी जोरदार टीका केली होती. इतके आजारी असूनही भाजपानं बापट यांना प्रचारात उतरवल्याचं टीकास्र विरोधकांनी सोडलं होतं.

याच दरम्यान, गिरीश बापट रुग्णालयातून थेट भाजपाच्या एका जनसंपर्क कार्यालयात दाखल झाल्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला होता. गिरीश बापट पुन्हा एकदा राजकारणात पूर्वीप्रमाणेच सक्रीय होणार, अशी चर्चा या घटनेनंतर सुरू झाली होती.

girish-bapat
गिरीश बापट पुण्यातील भाजपाच्या संपर्क कार्यालयात कार्यकर्त्यांची संवाद साधताना…

“गिरीशभाऊंना पुणेकरांचं अलोट प्रेम मिळालं”

“राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या मुशीत तयार झालेल्या गिरीशभाऊंनी जात, धर्म, पंथ, प्रांत, भाषा, पक्षभेदांच्या भिंती ओलांडून समाजकार्य, विकासाचं राजकारण केलं. टेल्को कंपनीतल्या कामगारनेत्यापासून सुरु झालेला त्यांचा प्रवास पुणे महापालिकेचे नगरसेवक, स्थायी समिती अध्यक्ष, आमदार, मंत्री, खासदार पदापर्यंत पोहचला. चार दशकांच्या प्रदीर्घ राजकीय वाटचालीत गिरीशभाऊंना पुणेकरांचं अलोट प्रेम मिळालं”, अशा शब्दांत अजित पवार यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.

“त्यांना असलेली माहिती पाहून चकित व्हायचो”, मुख्यमंत्र्यांनी दिला आठवणींना उजाळा!

“दुर्धर आजाराशी झुंजत असताना देखील गिरीश बापट हे आपल्या पक्षाला ऊर्जा देण्याचे काम करत होते. त्यांच्याशी भेट व्हायची तेव्हा राजकारणातलेच नव्हे तर अनेक विषयांवर त्यांना असलेली माहिती पाहून चकित व्हायचो. नुकतीच पुण्यात त्यांची विचारपूस करण्यासाठी भेटही झाली होती. त्यांनी त्यांची राजकीय कारकीर्द अगदी नगरसेवकापासून सुरू केली होती. आमदार खासदार आणि राज्य मंत्रिमंडळात मंत्री म्हणून त्यांनी सर्वसामान्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी कायम पुढाकार घेतला. पालकमंत्री म्हणून पुण्याच्या विकासाच्या दृष्टीने त्यांनी पाऊले उचलली होती. सर्व पक्षांमध्ये त्यांची मैत्री होती. त्यांच्या उत्तम जनसंपर्काचे उदाहरण नेहमी दिले जायचे. महापालिकेत तर पक्षाची सत्ता नसतानाही ते स्थायी समितीचे अध्यक्ष झाले होते. असा मनमिळावू आणि दिलदार नेता आज आपल्यातून गेला, अशा शब्दांत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.

“पुणे शहराच्या राजकारणात गेली ४० वर्षं अतिशय सक्रिय असलेले बापट माझे अतिशय जवळचे मित्र होते. गेल्या ३५ वर्षांपासून आम्ही राजकारणात एकत्र काम केलं”, अशी भावनिक प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अंकुश काकडे यांनी दिली आहे.

“हे नुकसान कधीही भरून निघणार नाही”

“गिरीश बापट गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. मला मनाला विश्वास वाटत होता की आजारी असतानाही त्यांच्याबद्दलच्या बातम्या चुकीच्या ठरतील. पण दुर्दैवाने त्या बातम्या खऱ्या ठरल्या. पुण्याच्या राजकारणाचं, समाजकारणाचं, पुणे-महाराष्ट्र भाजपाचं हे फार मोठं नुकसान आहे. विरोधी पक्षांना सोबत घेऊन कसं काम करायचं यामध्ये त्यांचं कौशल्य होतं. एखादी समस्या कशी सोडवायची, याचं त्यांचं वेगळं कसब होतं. ते सर्वांचे मित्र होते. कुणाशीही शत्रुत्व नाही. हे सगळं एका माणसामध्ये आयुष्यभर मेहनत घेऊन निर्माण होतं”, असं पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले.

“अत्यंत मनमिळाऊ आणि लोकप्रिय नेता”

“आत्ताच गिरीश बापट यांच्या निधनाची बातमी ऐकली. महाराष्ट्राच्या विधानसभेत काम करत असताना गिरीश बापट मंत्री होते. योगायोगाने आम्ही संसदेत एकत्र काम करू लागलो. संसदेच्या एका कमिटीचे ते चेअरमन होते आणि मी सदस्य होतो. गेल्या ५ वर्षांत सातत्याने गिरीश बापट यांनी सर्व सहकारी सदस्यांशी सलोख्याचे संबंध ठेवले होते. अत्यंत मनमिळाऊ आणि लोकप्रिय नेता असं त्यांचं वर्णन करावं लागेल. मंत्रीपद मिळाल्यानंतरही कोणतीही मिजास न ठेवता त्यांनी खेळकर स्वभाव कायम ठेवला होता”, अशा शब्दांत विनायक राऊत यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.