scorecardresearch

Kasba Bypoll Result 2023: “वापरा आणि फेका हे भाजपाचं धोरण आहे त्यामुळेच कसब्यात…” उद्धव ठाकरेंची टीका

कसबा पोटनिवडणुकीच्या निकालाविषयी उद्धव ठाकरे यांनी पहिली प्रतिक्रिया नेमकी काय दिली आहे जाणून घ्या

uddhav thackeray speech about By election
जाणून घ्या काय म्हटलं आहे उद्धव ठाकरे यांनी ?

कसबा पेठ निवडणुकीत महाविकास आघाडीचा उमेदवार जिंकल्याचा मला आनंद आहे. एवढ्या मोठ्या प्रभावातून कसबा बाहेर पडत असेल तर देश बाहेर पडायला काही हरकत नाही असं म्हणत माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. एका चांगल्या बदलाची सुरूवात आहे असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे. भाजपाच्या विरोधातली मतांची संख्या वाढते आहे ही एकत्र करणं हे मोठं आव्हान आहे असंही उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे. मतदार जागरूक होत चालले आहेत. त्यामुळे महाविकास आघाडीने एकत्र राहणं आणि कसोशीने प्रयत्न करणं आवश्यक आहे.

वापरा आणि फेका हे भाजपाचं धोरण आहे

वापरा आणि फेका हे भाजपाचं धोरण आहे हे मी बोललो होतो. तेच पुण्यात झालं. शिवसेनेचाही वापर करून फेकला. मुक्ता टिळक यांच्या घरातही तिकिट दिलं गेलं नाही त्यामुळे वापरा आणि फेका हेच समोर आलं. गिरीश बापट यांना ऑक्सिजनच्या नळ्या लावून प्रचाराला आणलं. सहानुभूती पाहिजे पण ती पण सिलेक्टिव्ह हवी हे मतदार कधी स्वीकारत नाही असंही उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.

मुख्यमंत्र्यांनी देशद्रोह्यांना चहापानासाठी बोलावलं होतं का?

मुख्यमंत्र्यांनी देशद्रोह्यांसोबतचं चहापान टळलं असं म्हटलं आहे पण त्यांनी देशद्रोह्यांना चहापानाला बोलावलं होतं का? तसंच समजा विरोधक जर चहापानाला आले असते तर त्यांना देशद्रोही म्हटलं गेलं होतं मग अशा लोकांसोबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी चहापान घेतलं असतं का? असा प्रतिप्रश्न उद्धव ठाकरे यांनी विचारला आहे. प्रकाश आंबेडकर यांच्या भेटीबाबत विचारलं असता उद्धव ठाकरेंनी देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला आहे. प्रकाश आंबेडकर आणि आमच्या भेटीगाठी दिवसाढवळ्या सुरू आहेत. आम्ही काय हुडी वगैरे घालून कुणाला भेटायला गेलो नाही असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं आहे.

कसबा पोटनिवडणुकीत रवींद्र धंगेकर विजयी

कसबा पोटनिवडणुकीत भाजपा विरूद्ध मविआ असा सामना होता. ही लढत दुरंगी होती आणि महाविकास आघाडी आणि भाजपाने ही निवडणूक प्रतिष्ठेची केली होती. भाजपाने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली होती तर रवींद्र धंगेकर हे महाविकास आघाडीचे उमेदवार होते. ११ हजार ४० मतांनी रवींद्र धंगेकर विजयी झाले आहेत. त्यानंतर मविआच्या प्रतिक्रिया समोर येत आहेत.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 02-03-2023 at 14:17 IST