पिंपरी : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत सर्वाेच्च न्यायालयात राज्य शासनाचा युक्तिवाद सुरू आहे. ओबीसी आरक्षणावर लवकरच निर्णय होईल. त्यानुसार न्यायालय निवडणूक घेण्यास मान्यता देईल. फेब्रुवारीत निकाल आला. तर, एप्रिल महिन्यात निवडणुका होऊ शकतील, असा दावा भाजप प्रदेशाध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी शनिवारी केला.

पिंपरी-चिंचवडमध्ये पत्रकारांशी बोलताना बावनकुळे म्हणाले, ‘आता खूप दिवस महापालिका नगरसेवकाविना राहू नयेत. लवकरच या निवडणुका होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. लवकर निकाल देण्याबाबत सर्वाेच्च न्यायालयाला विनंती केली जाणार आहे. फेब्रुवारीत निकाल आला तर एप्रिल महिन्यात निवडणुका होऊ शकतात. राज्य निवडणूक आयोगाने निवडणुका जाहीर करताच महाराष्ट्र शासन मनुष्यबळ, व्यवस्था उपलब्ध करून देईल. त्यामुळे निवडणुकीसाठी सज्ज रहावे. काहीही करून पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक जिंकायची आहे. त्यासाठी सदस्य नोंदणी वाढवावी. चार लाख सदस्य शहरातून वाढावेत. प्रत्येक बुथवरून पाच टक्के सक्रिय सदस्य करावेत. सदस्य नोंदणीसाठी शहराचे दोन जिल्हे करावेत’.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भाजप स्वबळावर निवडणूक लढविणार आहे का, याबाबत विचारले असता ते म्हणाले, ‘महापालिकेची निवडणूक स्थानिक आहे. त्यामुळे स्थानिक कमिटीला विश्वासात घेऊन निर्णय घेतला जाईल. महाराष्ट्र म्हणून महायुतीने सोबत लढले पाहिजे असा निर्णय घेतला आहे. पक्ष आणि मंत्र्यांमध्ये समन्वय रहावा, खात्याचे निर्णय जनतेपर्यंत पोहोचवेत यासाठी भाजपच्या मंत्र्यांकडे पक्षाच्या कार्यकर्त्यांची नियुक्ती केली आहे’, असेही त्यांनी सांगितले.