मंगळवारी देहू येथे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते करण्यात आले. उपमुख्यमंत्री व पालकमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ कीर्तनकार मारुतीबुवा कुऱ्हेकर, संत तुकाराम महाराज देवस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे आणि आध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले या वेळी उपस्थित होते. यावेळी कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करु न दिल्याने राज्यातील राजकारण तापलं आहे. मात्र, आता याबाबत स्टेजवर उपस्थित असलेले भाजपा अध्यात्मिक आघाडीचे अध्यक्ष तुषार भोसले यांनी या संपूर्ण प्रकाराबाबत आता स्पष्टीकरण दिलं आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते देहू येथे संत तुकाराम यांच्या शिळा मंदिराचे लोकार्पण करण्यात आले. परंतु, या ठिकाणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भाषण करण्यासाठी परवानगी नाकारण्यात आली. हा संपूर्ण महाराष्ट्राचा अपमान असून हा प्रकार गंभीर आणि वेदना देणारा आहे, अशा शब्दात खासदार सुप्रिया सुळे यांनी संताप व्यक्त केला आहे. व्यासपीठावर उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. देवेंद्र फडणवीस यांना भाषणासाठी संधी देणे हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे. पण, अजित पवार हे राज्याचे उपमुख्यमंत्री आहेत. पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री आहेत. या कार्यक्रमात त्यांना भाषण करू देण्याविषयीचा प्रस्ताव उपमुख्यमंत्री कार्यालयाकडून पंतप्रधान कार्यालयाकडे पाठविण्यात आला होता, पण तो नामंजूर करण्यात आला. अजित पवार यांना भाषणाची संधी देण्यात आली नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या.

पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमात अजित पवारांना भाषणाची संधी का नाही? सुप्रिया सुळे म्हणाल्या, “तिथे विरोधी पक्षनेत्यांना…”

यानंतर पेटलेल्या वादावर तुषार भोसले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “पंतप्रधानांच्या वेळेच्या व्यस्ततेमुळे हे झालं असेल बाकी यामध्ये काही नाही. पण यामध्ये एक सांगितले पाहिजे की पंतप्रधानांच्या हे लक्षात आल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांना सूचना केली की आपल्याला बोलायचे आहे का. त्यावेळी अजित पवारांनी नम्रपणे सांगितले की मला बोलायचे नाही. त्यामुळे हा वादाचा विषय न करता पंतप्रधान मोदींनी वारकऱ्यांशी जो संवाद साधला त्यावर चर्चा व्हायला हवी,” असे तुषार भोसले यांनी टीव्ही ९ सोबत बोलताना सांगितले.

अजित पवारांना देहूमधील कार्यक्रमात बोलू न दिल्याने संजय राऊत संतापून म्हणाले, “संपूर्ण महाराष्ट्राला…”

देहूतील कार्यक्रमात काय घडलं?

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या हस्ते देहूतील संत तुकाराम महाराजांच्या शिळा मंदिराचं लोकार्पण झालं. यावेळी राज्यभरातून वारकरी उपस्थित होते. या कार्यक्रमाला राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित होते. या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांनी भाषण केले. त्यानंतर अजित पवारांचे भाषण होईल असे वाटत होते. परंतु सुत्रसंचालकाने नरेंद्र मोदींना भाषणासाठी आमंत्रित केले. स्वत: नरेंद्र मोदींनी अजित पवारांना बोलण्यासाठी आग्रह केला. परंतु अजित पवार यांनी पंतप्रधानांना बोलण्यास सांगितले.