राज्य सरकारने दणक्यात सुरू केलेल्या ‘जीवन अमृत’ अर्थात ‘ब्लड ऑन कॉल’ योजनेला मंगळवारी एक महिना पूर्ण होत आहे. पुण्यात मात्र नागरिकांचा प्रतिसाद असूनही प्रत्यक्ष रक्तघटकच उपलब्ध नसल्यामुळे ही योजना सध्या तरी निष्प्रभ ठरताना दिसून येत आहे. गेल्या महिन्याभरात पुण्यात केवळ १६ नागरिकांना या योजनेद्वारे रक्त पुरवण्यात आले आहे.
मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी ७ जानेवारीला मुंबईत ‘ब्लड ऑन कॉल’ योजनेचे उद्घाटन केले. या योजनेतून रक्त मिळवण्यासाठी ‘१०४’ हा दूरध्वनी क्रमांक असून औंध येथील जिल्हा नागरी रुग्णालय येथे योजनेसाठी कॉल सेंटर सुरू करण्यात आले आहे. रक्त मिळवण्यासाठी पुणेकर चौकशी करत आहेत खरे, मात्र यात केवळ रक्तापेक्षा (व्होल ब्लड) इतर रक्तघटकांचीच मागणी करणारे दूरध्वनी अधिक आहेत. अॅनिमियासारख्या आजारांसाठी लाल रक्तपेशी, डेंग्यूसारख्या आजारांमध्ये प्लेटलेट्स तसेच भाजण्यावर प्लाझ्मा रक्तघटकाचा पुरवठा रुग्णांना करावा लागतो. त्यामुळे रक्तघटकांना असणारी मागणी अधिक आहे. गेले सुमारे वर्षभर रुग्णालयातील मेट्रो रक्तपेढी अन्न व औषध प्रशासनाकडून परवानगी रखडल्यामुळे सुरू झालेली नाही. त्यामुळे सध्या रुग्णालयातून केवळ ‘व्होल ब्लड’ पुरवता येत आहे.
जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. ए. बी. नांदापूरकर म्हणाले, ‘‘नागरिक ब्लड ऑन कॉलद्वारे प्रामुख्याने रक्तघटकांचीच मागणी करत असून यात उपनगर भागातून येणाऱ्या दूरध्वनींची संख्या अधिक आहे. रुग्णालयातील मेट्रो ब्लड बँक कार्यान्वित झालेली नसल्यामुळे रक्तघटकांची मागणी सध्या पुरवता येत नाही. मेट्रो ब्लड बँकेला अन्न व औषध प्रशासनाची मान्यता आल्यानंतर ती सुरू होऊ शकेल. रक्तघटकांचे युनिट सुरू झाल्यावर ते पुरवता येतील व नागरिकांचा प्रतिसादही वाढू शकेल.’’
सध्या मान्यतेच्या प्रतीक्षेत असलेल्या मेट्रो रक्तपेढीत दर वर्षी रक्त आणि रक्तघटकांच्या एक लाख पिशव्यांचा पुरवठा करण्याची क्षमता असणे अपेक्षित आहे. रक्ताचे घटक वेगळे करण्यासाठी या रक्तपेढीत ‘रेफ्रिजरेटेड सेंट्रिफ्यूज’ आणि ‘प्लाझ्मा एक्स्प्रेसर’ या उपकरणांचा समावेश आहे. तसेच वेगळ्या केलेल्या प्लेटलेट्सची सतत हालचाल करणारे ‘प्लेटलेट एजिटेटर’ हे उपकरणही या रक्तपेढीत आहे.
संग्रहित लेख, दिनांक 6th Feb 2014 रोजी प्रकाशित
पुण्यात ‘ब्लड ऑन कॉल’ निष्प्रभच? –
राज्य सरकारने दणक्यात सुरू केलेल्या ‘जीवन अमृत’ अर्थात ‘ब्लड ऑन कॉल’ योजना प्रत्यक्ष रक्तघटकच उपलब्ध नसल्यामुळे सध्या तरी निष्प्रभ ठरताना दिसून येत आहे
First published on: 06-02-2014 at 03:20 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Blood on call scheme