पुणे : शहरात सध्या अनेक रक्तपेढ्यांमध्ये रक्ताचा साठा कमी झाला आहे. वर्षअखेरीच्या सुट्यांमुळे रक्तदान शिबिरांचे प्रमाण घटल्यामुळे रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. अनेक रक्तपेढ्यांमध्ये केवळ एक दिवसाचा साठा शिल्लक आहे. पुढील काही दिवसांत रक्तदान शिबिरे पुन्हा सुरू झाल्यास परिस्थिती सुधारण्याची आशा रक्तपेढ्यांना आहे. दरम्यान, काही रक्तपेढ्यांनी पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त झालेल्या जास्त रक्तदानाकडे बोट दाखविले आहे.

अनेक रक्तपेढ्यांकडे वर्षअखेरीच्या सुट्यांमुळे रक्तदान कमी झाल्याने रक्ताचा नवीन साठा जमा झालेला नाही. आधीच्या रक्तसाठ्यावर या रक्तपेढ्यांकडून सध्याची रुग्णांची गरज भागवली जात आहे. याबाबत ससून सर्वोपचार रुग्णालयातील रक्तपेढीचे प्रमुख डॉ. सोमनाथ खेडकर म्हणाले की, आमच्याकडे दररोज ५० ते ६० पिशव्यांची आवश्यकता असते. सध्या आमच्याकडे रक्ताच्या पिशव्यांचा एक दिवस पुरेल एवढा साठा आहे. पुढील दोन -तीन दिवसांत काही रक्तदान शिबिरे होणार आहेत. त्यामुळे रक्ताचा साठा पुरेसा होण्याची आशा आहे.

जनकल्याण रक्तपेढीचे संचालक डॉ. अतुल कुलकर्णी यांनीही सध्या रक्ताचा साठा कमी असल्याचे सांगितले. ते म्हणाले की, आमच्याकडील दैनंदिन मागणी सुमारे ५० रक्तपिशव्या आहे. आमच्याकडे सध्या २०० रक्तपिशव्यांचा साठा आहे. शहरांतील रुग्णालये आणि इतर रक्तपेढ्यांमध्ये साठा कमी असल्याने आमच्याकडील दैनंदिन मागणीत २० टक्के वाढ झाली आहे. सर्वसाधारणपणे सप्टेंबरपासून सणासुदीचा काळ सुरू होत असल्याने रक्तदान शिबिरे कमी झाली. वर्षअखेरीच्या सुट्यांमुळेही रक्तदान कमी झाले. उद्यापासून रक्तदान शिबिरे होत असून, परिस्थितीत सुधारणा होईल.

हेही वाचा : मकर संक्रांतीनिमित्त मोदींनी गोसेवा केलेल्या पुंगनूर गाईंची ‘ही’ आहेत खास वैशिष्ट्ये; जाणून घ्या सविस्तर…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ सप्टेंबरपासून १५ दिवस रक्तदान शिबिरांचे आयोजन करण्यात आले. ही रक्तदान शिबिरे मोठ्या प्रमाणात होऊन रक्त संकलनही वाढले होते. त्यावेळी गरजेपेक्षा जास्त रक्तसाठा झाला. त्यामुळे नंतर महिनाभर रक्ताची टंचाई जाणवली नाही. रक्ताची पिशवी ३५ दिवसांपर्यंत वापरता येते. त्यानंतर त्या रक्ताचा वापर करता येत नाही. याचबरोबर रक्तदात्याला रक्तदान केल्यानंतर ३ महिने रक्तदान करता येत नाही. त्यामुळे दिवाळीच्या काळापासून टंचाई सुरू झाल्याचे काही रक्तपेढीचालकांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले.