आरोग्यावर लेखन करणारे लेखक आणि या प्रकारच्या पुस्तकांचे प्रकाशक यांच्या संख्येत गेल्या दहा वर्षांत शहरात प्रचंड वाढ झाली असून आरोग्यावरील पुस्तके खरेदी करण्यातही चोखंदळ पुणेकरच राज्यात आघाडीवर असल्याचे दिसून आले आहे. सध्या वजन घटवणे आणि गर्भसंस्कार या विषयांवरील पुस्तकांबरोबरच चक्क जुन्या आयुर्वेदिक ग्रंथांनाही शहरात वाढती मागणी असल्याचे निरीक्षण काही पुस्तकविक्रेत्यांनी नोंदवले आहे.
‘अक्षरधारा बुक गॅलरी’चे रमेश राठिवडेकर म्हणाले, ‘‘पुण्यात भरवलेल्या पुस्तकांच्या प्रदर्शनांमध्ये आरोग्यावरील पुस्तकांची होणारी विक्री राज्यात इतर ठिकाणी होणाऱ्या विक्रीपेक्षा अधिक असल्याचा आमचा अनुभव आहे. आरोग्यावर लिहिणारे लेखक आणि प्रकाशकही पुण्यातच सर्वाधिक आहेत. ग्राहकाने खरेदी केलेल्या एकूण पुस्तकांपैकी साधारणपणे ३० टक्के खर्च आरोग्यावरील पुस्तकांचा असतो. सध्या बाजारात वजन घटवणे आणि गर्भसंस्कार या दोन विषयांवरील पुस्तकांची संख्या उदंड आहे. त्याखालोखाल दररोज किती कॅलरी असलेला आहार घ्यावा, अशा पद्धतीची आहारासंबंधीची आकडेवारी देणाऱ्या पुस्तकांची चलती आहे.’’
पूर्वी एकाच पुस्तकात अनेक आजारांविषयी संक्षिप्त माहिती देणाऱ्या पुस्तकांची चलती होती. आरोग्यावरील पुस्तकांच्या सध्याच्या बाजारपेठेवर नजर टाकता या पुस्तकांची जागा ‘एक आजार एक पुस्तक’ या प्रकारच्या पुस्तिकांनी घेतली आहे. पाठदुखी, कंबरदुखी, गुडघेदुखी, पोटाचे विकार, रक्तदाब, मधुमेह, आम्लपित्त या विषयांवरील पुस्तिका बाजारात प्रामुख्याने दिसत आहेत. ‘पॉकेट बुक’ प्रकारच्या या पुस्तिका आकाराने लहान, हलक्या असून त्यांची किंमतही कमी असल्याने त्यांना चांगली मागणी आहे. ‘रोहन प्रकाशन’चे प्रदीप चंपानेरकर म्हणाले, ‘‘पाठदुखी आणि संगणकाच्या अति वापरामुळे शरीरावर होणारे दुष्परिणाम या विषयावरील पुस्तकांना पुण्यात विशेष प्रतिसाद मिळतो. डॉक्टरांकडे गेल्यानंतरही रुग्णांच्या मनात राहून जाणाऱ्या शंकांवर आधारित प्रश्नोत्तरांच्या स्वरूपातील पॉकेट बुक्स आम्ही बाजारात आणली असून त्यांचाही खप चांगला आहे.’’
वजनदार आयुर्वेदिक ग्रंथांनाही मागणी
‘चरकसंहिता’, ‘आर्यभिषक अर्थात हिंदुस्थानचा वैद्यराज’, ‘सुलभ औषधी प्रभाकर’, ‘चिकित्सा प्रभाकर’, ‘सार्थ वाग्भट’ अशा जुन्या आयुर्वेदिक ग्रंथांना आजही मागणी असल्याचे दिसते. हे ग्रंथ चांगलेच वजनदार, जाडजूड आहेत. त्यांची किंमतही अधिक आहे. तरीही त्यांचा खप घटलेला नाही.
डॉक्टर लेखकांचा स्वत:चा वाचकवर्ग
ज्या डॉक्टरांची प्रॅक्टिस उत्तम चालते किंवा जे डॉक्टर्स विशेष प्रसिद्घ आहेत त्यांच्या पुस्तकांचा वेगळा वाचकवर्ग तयार झालेला दिसतो. कोणत्या विषयावरील पुस्तक हवे ते न सांगता डॉक्टरांचे नाव सांगून त्यांच्या पुस्तकांची मागणी करणारे वाचक वाढले आहेत. डॉ. ह. वि. सरदेसाई, डॉ. अभय बंग, डॉ. अरविंद बावडेकर, डॉ. मालती कारवारकर, डॉ. लिली जोशी, डॉ. सुनील गोडबोले, डॉ. राजीव शारंगपाणी या डॉक्टरांचा स्वतंत्र वाचकवर्ग असल्याचे काही पुस्तकविक्रेत्यांनी सांगितले.
ही आहेत सध्याची ‘बेस्टसेलर्स’-
– ‘सुप्रजेसाठी गर्भसंस्कार’
– ‘आध्यात्मिक विचारातून आनंदमयी गरोदरपण’
– ‘डोण्ट लूज युवर माईंड, लूज युवर वेट’
– ‘द लिव्ह वेल डाएट’
– ‘४ आठवडय़ांत वजन कमी करा’
– ‘जंक फूड की स्वास्थ्य- सौंदर्य?’
– ‘आई होताना काय खावे?’