पिंपरी चिंचवड येथील बोपखेलमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. एका १६ वर्षीय मुलाने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. महेश नागेंद्र शेट्टी असे आत्महत्या केलेल्या मुलाचे नाव आहे. ही घटना शुक्रवारी (दि. ९) सायंकाळी पाचच्या सुमारास घडली. आत्महत्येमागचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महेश शेट्टी ( रा. बाराते वस्ती, पंचशील नगर, बोपखेल) याने राहत्या घरी आत्महत्या केली. महेश हा सायंकाळी पाचच्या सुमारास आजी समवेत वरच्या खोलीत झोपला होता. आजी काही कामानिमित्त खालच्या मजल्यावरील खोलीत गेली असता महेशने साडीच्या सहाय्याने कपडे अडकवायच्या पट्टीला गळफास घेऊन आत्महत्या केली. तो खडकी येथील एस.ई.ई या शाळेत नववीच्या वर्गात शिकत होता.
विशेष म्हणजे घरात आई, वडील, आजी होते. मात्र आई-वडील खालच्या खोलीत होते तर आजी त्याच्याबरोबर वरच्या मजल्यावरील खोलीत होती. दुर्दैवाने आजी खाली येताच महेशने हे टोकाचे पाऊल उचलले. घटनेनंतर लगेचच त्याला खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता. महेशचे वडील हे भाजी विक्रीचा व्यवसाय करतात. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असल्याची माहिती पोलिसांनी दिली असून पुढील तपास सुरू आहे.