ज्येष्ठ वनस्पतीशास्त्रज्ञ प्रा. श्री. द. महाजन यांचा महापालिकेतर्फे खास सत्कार केला जाणार असून महापालिका सभागृहात बुधवारी (५ जून) या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
महापौर वैशाली बनकर यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. महाजन यांनी आजवर केलेल्या संशोधनाचा, त्यांच्या निसर्गप्रेमाचा आणि त्यांनी सुरू केलेल्या निसर्गविषयक उपक्रमांचा, चळवळींचा गौरव व्हावा, या हेतूने पुणेकरांच्या वतीने त्यांचा सत्कार करण्याचा ठराव महापालिकेने यापूर्वीच एकमताने मंजूर केला होता. महाजन यांचा खास सत्कार माधव गाडगीळ, मोहन धारिया आणि खासदार वंदना चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत केला जाणार असून महापालिकेतर्फे त्यांना मानपत्रही दिले जाणार आहे. महापालिका सभागृहात दुपारी तीन वाजता हा कार्यक्रम होईल.
वनस्पतींच्या वर्गीकरण शास्त्राचे गाढे अभ्यासक, देवरायांचे अभ्यासक, जंगल-वनांची डोळस भटकंती करणारे संशोधक आणि स्वत:कडील ज्ञानभांडार मुक्तपणे कोणालाही देण्यासाठी सतत तयार असलेले निसर्गप्रेमी असे महाजन सरांचे व्यक्तिमत्त्व आहे. कोल्हापूर येथे त्यांनी निसर्ग मित्र मंडळ स्थापन केले होते आणि या मंडळातर्फे देवराई वाचवा ही चळवळ त्यांनी उभी केली. पुण्यातही त्यांनी निसर्गाची ओळख करून देण्याचे आणि निसर्गसंवर्धनाचे अनेक उपक्रम सुरू केले असून निसर्ग सेवक संघातर्फे घेण्यात येणाऱ्या परिचय वर्गातही महाजन यांचे महत्त्वाचे योगदान आहे. अनेक संस्था आणि महाविद्यालयांसाठी मार्गदर्शक म्हणूनही ते काम करतात. महाराष्ट्र वृक्ष संवर्धिनीचे अध्यक्ष आणि एम्प्रेस गार्डनचे विश्वस्त या पदांवर सध्या ते काम करत आहेत.