प्रेमसंबंध ठेवण्यास नकार दिल्याने एका तरूणीला धमकावण्यात आल्याची घटना धक्कादायक घटना पुण्यातून समोर आली आहे. पुण्याच्या कुमठेकर रस्त्यावर एका तरुणीला एका तरुणानं धमकावल्याची घटना घडली. या प्रकरणी तरुणाला अटक करण्यात आली आहे.

प्रज्वल संजय जाधव (वय २२, सध्या रा. मुंजोबाचा बोळ, नारायण पेठ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत एका तरूणीने विश्रामबाग पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. तक्रारदार तरूणी शहरात शिक्षणासाठी आली आहे. आरोपी जाधव तिला ओळखतो. जाधवने तिला प्रेमसंबंध ठेवण्यास सांगितले होते. तरुणीने नकार दिल्यानंतर जाधवने तिला कुमठेकर रस्त्यावर अडवले. “माझ्याशी प्रेमसंबंध न ठेवल्यास तुझे करीअर खराब करतो,” अशी धमकी त्याने दिली. तरुणीने पोलिसांकडे तक्रार दिल्यानंतर जाधवला अटक करण्यात आली. सहाय्यक पोलीस निरीक्षक राहुल कोलंबीकर तपास करत आहेत.