दुचाकीच्या बॅटरी चोरल्याचा संशयावरून कचरा वेचणाऱ्या मुलाच्या अंगावर पेट्रोल ओतून जाळल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. कसबा पेठेतील पवळे चौक परिसरात बुधवारी दुपारी ही घटना घडली. गंभीर भाजलेल्या मुलावर ससून रुग्णालयात उपचार सुरू असून या प्रकरणी फरासखाना पोलिसांनी एकाला गजाआड केले.
सावन धर्मा राठोड (वय १७) असे गंभीर रीत्या भाजलेल्या मुलाचे नाव आहे. तर त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून पेटविणारे आरोपी इब्राहिम मेहबूब शेख (वय ३५) इम्रान तांबोळी (वय २८) झुबेर तांबोळी (वय २६, तिघे रा. कसबा पेठ) यांना अटक करण्यात आली आहे. सावन हा फिरस्ता असून तो कचरा वेचण्याचे काम करतो. त्याला दारू पिण्याचे व्यसन आहे.
सावन हा बुधवारी (१३ डिसेंबर) कसबा पेठेतील पवळे चौक परिसरात आला. तेथील एका देशी दारू विक्री करणाऱ्या दुकानात त्याने दारू पिली. दुपारी दोन वाजण्याच्या सुमारास तो तांबट हौद चौकाच्या दिशेने निघाला होता. त्या वेळी आरोपी इब्राहिम, झुबेर आणि इम्रान यांनी सावन याला अडविले. ‘तू या परिसरात चोऱ्यामाऱ्या करतो. दुचाकीच्या बॅटऱ्या देखील चोरल्या आहेस,’ असे आरोपी सावन याला म्हणाले. ‘तुला जिवंत जाळले पाहिजे,’ अशी धमकी देऊन आरोपींनी त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली. आरोपींनी त्याच्या अंगावर पेट्रोल ओतून काडी लावली. होरपळलेल्या सावन याने आरडाओरडा सुरू केला. त्यानंतर आरोपींनी त्याला धमकावून तेथे लावलेल्या एका टेम्पोत बसण्याची सूचना केली. सुमारे अर्धा तास आरोपींनी सावन याला डांबून ठेवले. त्यानंतर आरोपी इब्राहिम, झुबेर आणि इम्रान हे गंभीर भाजलेल्या सावन याला टेम्पोत बसवून डेंगळे पुलानजीक गेले. सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास महापालिका भवनजवळ असलेल्या बसस्थानक परिसरात सोडून तिघे आरोपी टेम्पोतून पसार झाले.
भाजलेल्या अवस्थेत पोलीस चौकीत
शनिवारवाडय़ानजीक असलेल्या शेख सल्लाह दग्र्याच्या परिसरात सावन याला त्याचे दोन कचरावेचक मित्र भेटले. त्याने त्यांना या घटनेची माहिती मित्रांना दिली. सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास दोघा मित्रांनी त्याला जवळच असलेल्या कसबा पेठ पोलीस चौकीत नेले. तेथून पोलिसांनी त्याला तातडीने ससून रुग्णालयात नेले. सावन हा गंभीर भाजला असून त्याने रात्री पोलिसांना जबाब दिला. त्याच्या जबाबानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त तुषार दोशी, सहायक पोलीस आयुक्त प्रवीण कुलकर्णी, फरासखाना पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक रेखा साळुंके, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्वर भोसले यांनी घटनास्थळी भेट दिली. गुरुवारी मध्यरात्री आरोपी इब्राहिम याला कसबा पेठेतून ताब्यात घेतले.