पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने सायबर चोरट्यांनी कर्वेनगर भागातील एका व्यावासयिकाची ९७ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी चोरट्यांविरुद्ध शिवाजीनगर येथील सायबर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत एका व्यावसायिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, सायबर चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार व्यावसायिक हे कर्वेनगर भागात राहायला आहेत. सायबर चोरट्यांनी व्यावसायिकाच्या मोबाइल क्रमांकावर संदेश पाठविला होता. शेअर बाजारात गुंतवणूक केल्यास चांगला परतावा मिळेल, असे आमिष चोरट्यांनी त्यांना दाखविले होते. चोरट्यांनी त्यांना समाज माध्यमातील एका समुहात सहभागी करून घेतले होते. त्यांना शेअर बाजारातील विविध योजनांविषयी माहिती दिली होती. सुरुवातीला व्यावसायिकाने थोडी रक्कम गुंतविली. गुंतवणुकीवर चोरट्यांनी त्यांना परतावा दिल्याचे भासाविले. प्रत्यक्षात त्यांना परतावा देण्यात आला नव्हता.

परतावा समाज माध्यमातील समुहात दिसल्याने व्यावसायिकाचा विश्वास बसला. त्यानंतर चोरट्यांनी शेअर बाजारात आणखी रक्कम गुंतविण्यास सांगितले. व्यावसायिकाने शेअर बाजारात गेल्या पाच ते सहा महिन्यात वेळोवेळी ९७ लाख ५० हजार रुपये गुंतविले. रक्कम गुंतविल्यानंतर त्यांना परतावा दिला नाही, त्यानंतर त्यांनी चोरट्यांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. चोरट्यांनी त्यांना प्रतिसाद दिला नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी नुकतीच सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे तपास करत आहेत.

सिंहगड रस्ता भागातील एकाची ३६ लाखांची फसवणूक

शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने आणखी एकाची ३६ लाख रुपयांची फसवणूक करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याबाबत एकाने सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तक्रारदार हे नऱ्हे भागात राहायला आहे. सायबर चोरट्यांनी त्यांना शेअर बाजारात गुंतवणूक करण्याचे आमिष दाखवून जाळ्यात ओढले. परतावा देण्याच्या आमिषाने त्यांची ३६ लाख रुपयांची फसवणूक केली. गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक उल्हास कदम तपास करत आहेत.