विशाखापट्टणममधून गांजाची तस्करी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पुणे : विशाखापट्टणमधून पाठविण्यात आलेल्या शहाळ्यांच्या गाडीतून  गांजा विक्रीसाठी घेऊन निघालेल्या तिघांना गुन्हे शाखेने हडपसर भागात पकडले. या कारवाईत पोलिसांनी दोन चारचाकी वाहनांसह १२० किलो गांजा जप्त करण्यात आला.

याप्रकरणी समीर हसनअली शेख (वय ३७, रा. जोगेश्वरी, मुंबई), हिमायतउल्ला मोहम्मद अली शेख (वय ४१, रा. अंधेरी, मुंबई), अश्विन शिवाजी दानवे (वय २६, रा. अंधेरी, मुंबई) यांना अटक करण्यात आली. हडपसर भागात खंडणी विरोधी पथकाने संशयित वाहनांची तपासणी करण्यासाठी नाकाबंदी केली होती. विशाखापट्टणममधून निघालेल्या एका चारचाकी गाडीतून गांजाची तस्करी करण्यात येणार असून गांजा मुंबईत विक्रीसाठी पाठविण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक नीलेशकुमार महाडिक यांना मिळाली. त्यानंतर अतिरिक्त आयुक्त अशोक मोराळे,  उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते, उपनिरीक्षक संजय गायकवाड,  मगर, रमेश गरूड, शिंदे, फिरोज बागवान, पवार, मोहन येलपल्ले यांनी सापळा लावला.

रविवारी दुपारी तीनच्या सुमारास पुणे-सोलापूर महामार्गावर पोलिसांनी एका संशयित मोटारीची तपासणी केली. त्यानंतर मोटारचालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. मोटारीतून ४८ किलो गांजा जप्त करण्यात आला. विशाखापट्टणममधून  शहाळी ठेवलेल्या टेम्पोतून गांजा मुंबईत पाठविण्यात येणार असून टेम्पो द्रुतगती मार्गावरील खालापूर टोलनाक्याजवळून पुढे निघाला असल्याची माहिती त्यांनी दिली. पोलिसांनी तातडीने ग्रामीण पोलिसांना ही माहिती दिली. खालापूर टोलनाक्याजवळ टेम्पोचा पाठलाग करून टेम्पो अडवण्यात आला. टेम्पोत शहाळ्याखाली गांजाची पोती ठेवल्याचे आढळून आले.

विशाखापट्टणम ते  बडोदा प्रवास परवाना

या प्रकरणात अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून आंध्रप्रदेश ते गुजरातमधील  बडोदा दरम्यानचा प्रवासी परवाना आढळून आला आहे. त्यांच्याकडून बनावट क्रमांकाची वाहनपाटी, मोटार, टेम्पो तसेच १२० किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cannabis smuggling in school bus zws
First published on: 27-05-2020 at 01:33 IST