पुणे : महाराष्ट्र राज्य शिक्षक विकास अकादमी आणि भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था (आयसर पुणे) शिक्षकांच्या प्रशिक्षणासाठी एकत्र आल्या आहेत. राज्यातील विद्यापीठे, महाविद्यालयातील पदवीपूर्व आणि पदव्युत्तर स्तरावरील साडेपाच हजार शिक्षकांच्या क्षमतावृद्धीच्या प्रशिक्षणासाठीचा अभ्यासक्रम विकसित करून शिक्षकांसाठी कार्यशाळा घेतल्या जाणार आहेत.

उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत या संदर्भातील सामंजस्य करार करण्यात आला. उच्च व तंत्रशिक्षण विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, महाराष्ट्र राज्य शिक्षक विकास अकादमीचे कार्यकारी संचालक डॉ. निपुण विनायक, रुसाचे सहसंचालक प्रमोद पाटील, शैक्षणिक विभागाचे संचालक डॉ. विजय जोशी, आयसर पुणेचे संचालक डॉ. जयंत उदगावकर, कुलसचिव कर्नल (निवृत्त) राजा शेखर, प्रा. हरिनाथ चक्रपाणी, डॉ. सौरभ दुबे आदी या वेळी उपस्थित होते.

कराराअंतर्गत आयसर पुणेकडून अध्यापन कौशल्ये, संशोधनाधिष्ठित अध्यापन पद्धती, विज्ञान आणि गणितातील मूलभूत संकल्पना या विषयी ऑनलाइन आणि प्रत्यक्ष कार्यशाळा घेतल्या जातील.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

राज्यातील विज्ञान आणि गणिताच्या अध्यापनासाठी शिक्षकांना त्यांच्या गरजेनुसार प्रशिक्षण देण्यात येईल. राज्यातील ५ हजार ५०० शिक्षकांना टप्प्याटप्प्याने प्रशिक्षण दिले जाईल. आंतरविद्याशाखीय अध्यापन शास्त्र, नेतृत्व, नवसंकल्पना, सर्वसमावेशकता या संदर्भात विद्यापीठे आणि श्रेष्ठत्वाचा दर्जा मिळालेल्या संस्थांच्या (इन्स्टिट्यूट ऑफ एमिनन्स) सहकार्याने कार्यक्रम राबवले जातील, असे डॉ. विनायक यांनी सांगितले. आयसर पुणे शाळा, महाविद्यालयातील गणित आणि विज्ञानाच्या शिक्षकांसाठी सातत्याने कार्यशाळा घेत आहे. आता शिक्षक अकादमीच्या माध्यमातून राज्यातील महाविद्यालय स्तरावरील शिक्षकांच्या क्षमतावृद्धीचे उपक्रम राबवले जातील, असे प्रा. चक्रपाणी यांनी सांगितले.