पुणे-नाशिक महामार्गावर नियंत्रण सुटल्याने दीडशे फूट खोल दरीत कोसळली कार; सुदैवाने जीवितहानी नाही

खेड पोलिसांनी तत्परता दाखवत दरीतून चालकाला बाहेर काढले

car crashed 150 feet deep valley Pune-Nashik highway

पुणे-नाशिक महामार्गावर खेड घाटात चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून दीडशे फूट खोल दरीत कोसळल्याची घटना समोर आली आहे. सुदैवाने यात चालक बचावला असून खेड पोलिसांनी त्याला सुखरूप दरीतून वर काढले आहे. संजय मधुकर खैरनार (४९) असे अपघात जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. खेड घाटातील बाह्यवळणावर मध्यरात्री हा अपघात झाला असून दीडशे फूट खोल दरीत मोटार कोसळली होती.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संजय खैरनार हे एकटेच पुणे – नाशिक महामार्गावरून गाडीतून प्रवास करत होते. खेड घाटातील बाह्यवळण येथे येताच खैरनार यांचं गाडीवरील नियंत्रण सुटलं आणि मोटार थेट दीडशे फूट खोल दरीत कोसळली. यात, खैरनार हे जखमी झाले असून त्यांच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, दरीत गाडी कोसळली असल्याची माहिती खेड पोलिसांना मिळताच एक पथक घटनास्थळी दाखल झाल.

पोलीस कर्मचारी स्वप्नील गाढवे, संतोष घोलप, भोईर , जाधव, अर्जुन गोडसे, लोखंडे (होमगार्ड),बाळा भांबुरे, यांनी तात्काळ घटनास्थळी दाखल होऊन दरीतील अपघात ग्रस्त खैरनार यांना बाहेर काढलं आणि तात्काळ रुग्णवाहिकेमधून रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दरम्यान, वाहनचालकांनी घाट क्षेत्रात लक्ष देऊन गाडी चालवावी, स्वतःचे आणि इतरांचे प्राण धोक्यात घालू नये असे आवाहन वरिष्ठ पोलीस निरीक्षक गुरव यांनी केले आहे.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Car crashed 150 feet deep valley pune nashik highway abn 97 kjp