पुणे : दुबई ते पुणे विमानप्रवासात प्रवाशाच्या पिशवीतून दीड लाख रुपये लांबविण्यात आल्याची घटना उघडकीस आली. पुणे आंतराष्ट्रीय विमानतळावर शुक्रवारी पहाटे उतरल्यानंतर प्रवाशाने पिशवीची तपासणी केली, तेव्हा रोकड चोरीचा प्रकार उघडकीस आला. या प्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत सुयोग सपकाळ (वय ४५, रा. पिंपरी) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सपकाळ कामानिमित्त दुबईला गेले होते. दुबईतील त्यांच्या मित्राने त्यांना दीड लाख रुपये वैयक्तिक व्यवहारासाठी रोख स्वरूपात दिले होते. ही रक्कम त्यांनी ट्रॉली बॅगेत ठेवली होती. गुरुवारी (१ मे) रात्री पावणेदहाच्या सुमारास ते दुबई विमानतळावर पोहोचले. त्यानंतर ते विमानाने पुण्याकडे रवाना झाले. त्यांनी ट्रॉली बॅग विमानात तपासणी करून (चेक-इन) दिली होती.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

शुक्रवारी (२ मे) पहाटे ते पुणे विमानतळावर पोहोचले. तपासणी झाल्यानंतर त्यांना पिशवी मिळाली. तेव्हा पिशवीचे कुलूप तुटल्याचे दिसले. आतील साहित्य अस्ताव्यस्त होते. त्यांनी तपासणी केली असता दीड लाख रुपये चोरीला गेल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार नोंदविली. वरिष्ठ पोलीस निरीक्षक अजय संकेश्वरी यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू आहे.