भारतीय स्वातंत्र्यलढय़ाच्या असंतोषाचे जनक लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची मंडालेहून सुटका झाल्याच्या घटनेला जून २०१४ मध्ये शंभर वर्षे पूर्ण होत आहेत. या घटनेची स्मृती जागविण्याबरोबरच लोकमान्यांच्या विचारांचा जागर घडावा, या उद्देशातून लोकमान्य टिळक विचार मंचतर्फे  लोकमान्य टिळक स्मृती अभियानांतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कार्यक्रमांपैकी सोमवारी (२७ जानेवारी) होणाऱ्या कार्यक्रमाने अभियानाचा शुभारंभ होत आहे.
शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांच्या हस्ते टिळक स्मारक मंदिर येथे सोमवारी सायंकाळी सहा वाजता या अभियानाचे उद्घाटन होणार आहे. ‘टिळक विचार आणि सद्य:स्थिती’ या विषयावर माजी सनदी अधिकारी अविनाश धर्माधिकारी यांचे व्याख्यान होणार असल्याची माहिती लोकमान्य टिळक स्मृती अभियानाचे अध्यक्ष शैलेश टिळक यांनी पत्रकार परिषदेत दिली. अभियानाच्या सचिव नगरसेविका मुक्ता टिळक, उपाध्यक्ष अरिवद व्यं. गोखले, सागर देशपांडे आणि शेखर बडवे या वेळी उपस्थित होते.
लोकमान्यांना अभिप्रेत असलेला समर्थ भारत घडवावा आणि राष्ट्रभक्ती डोळ्यासमोर ठेवून युवकांना प्रेरणादायी ठरतील असे उपक्रम १५ ऑगस्टपर्यंत राबविण्यात येणार आहेत. या अभियानातील मुख्य कार्यक्रम १५ जून रोजी होणार असून क्रांतिकारकांच्या कुटुंबीयांची ओळख जनतेला व्हावी, या उद्देशाने देशभरातील ३० क्रांतिकारकांच्या वारसांना आमंत्रित करण्यात येणार आहे. याखेरीज प्रत्येक महिन्यामध्ये विविध क्षेत्रातील तज्ज्ञांची व्याख्याने ऐकण्याची संधी पुणेकरांना लाभणार आहे, असेही शैलेश टिळक यांनी सांगितले.