पुणे : केंद्र सरकारकडून राज्यातील सर्व मान्यता प्राप्त शाळांची माहिती यु-डायस प्लस प्रणालीमार्फत संगणकीकृत करण्यासाठी १० नोव्हेंबरची मुदत देण्यात आली आहे. यु-डायस प्लस प्रणालीद्वारे मिळणाऱ्या माहितीच्या आधारेच केंद्र शासनाकडून समग्र शिक्षा योजनेचे वार्षिक नियोजन, राज्यनिहाय शैक्षणिक निर्देशांकांची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

यु-डायस प्लस प्रणालीमध्ये केंद्र शासनाकडून दोन टप्प्यामध्ये माहिती गोळा करण्यात येणार आहे. पहिल्या टप्प्यात शाळेची सांख्यिकी माहिती, शाळा सुरक्षा, अनुदान आणि खर्च, व्यावसायिक प्रशिक्षण, भौतिक सुविधा, संगणक आणि नाविन्यपूर्ण डिजिटल उपक्रम, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी वर्ग आदी माहिती संगणकीकृत करण्यात येणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात शाळांतील विद्यार्थ्यांची तपशीलवार माहिती, शासनाकडून दिल्या जाणाऱ्या सुविधा, व्यावसायिक शिक्षण संबंधित माहिती, शाळाबाह्य विद्यार्थ्यांची माहिती, आधार संबंधित माहिती, आरटीई प्रवेश, सहाय्यभूत सुविधा आदी माहिती यु-डायस प्लस प्रणालीद्वारे शाळास्तरावर अद्ययावत करण्यात येणार आहे.

हेही वाचा >>> आपत्कालीन परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी यंत्रणा सज्ज ठेवावी ; पिंपरी-चिंचवड पालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची सूचना

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

यु-डायस प्लस प्रणाली १७ ऑक्टोबर कार्यान्वित करण्यात आली आहे. त्यामुळे जिल्हा स्तरावर यु-डायस प्लस प्रणालीचे काम करण्याऱ्या अधिकाऱ्यांनी कार्यशाळा आयोजित करून जिल्ह्यातील यु-डायस संबंधित काम करणारे संबंधित गटशिक्षणाधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, कार्यक्रम अधिकारी, बांधकाम विभागाचे अधिकारी, दिव्यांग विद्यार्थ्यांकरिता काम करणारे अधिकारी, मोबाईल शिक्षक आदी अधिकाऱ्यांना, शाळा मुख्याध्यापकांना प्रशिक्षण द्यावे. प्रशिक्षणात माहिती संकलनाबाबत मार्गदर्शन करावे. संबंधित माहिती केंद्र आणि राज्य सरकारच्या विविध योजनांच्या अंमलबजावणासाठी आवश्यक असल्याने अचूक असणे आवश्यक आहे, अशा सूचना महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक कैलास पगारे यांनी जिल्हा परिषदांचे मुख्य कार्यकारी अधिकारी, उपसंचालक, शिक्षणाधिकारी यांना परिपत्रकाद्वारे दिल्या.