अंदमान येथे सप्टेंबरमध्ये होत असलेल्या विश्व मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागत समितीच्या अध्यक्षपदाची धुरा केंद्रीय पर्यावरणमंत्री प्रकाश जावडेकर यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना समर्पित होत असलेल्या या संमेलनाच्या स्वागत समितीमध्ये एखाद-दुसरा अपवाद वगळता बहुतांश मंडळी ही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षाशी संबंधित असल्याची चर्चा साहित्य वर्तुळामध्ये होत आहे.
अमेरिकेतील सॅनहोजे, सिंगापूर आणि दुबई अशी तीन विश्व साहित्य संमेलने सलग झाल्यानंतर त्यामध्ये तब्बल चार वर्षांचा खंड पडला. दरम्यानच्या कालखंडामध्ये कॅनडा येथील टोरॅण्टो आणि दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्ग येथे ठरलेले संमेलन रद्दबादल करण्यात आले. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीमध्ये विश्व साहित्य संमेलन करायचेच या निग्रहातून अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी अंदमान हे स्थळ निश्चित केले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या स्मृती सुवर्णमहोत्सवी वर्षांत होणारे हे संमेलन त्यांनाच समर्पित करण्यात आले आहे. ‘ऑफबीट डेस्टिनेशन्स आणि पोर्ट ब्लेअर येथील महाराष्ट्र मंडळ यांच्यातर्फे ५ आणि ६ सप्टेंबरला येथे चौथे विश्व साहित्य संमेलन होत आहे.
अंदमान येथील संमेलनासाठी स्वागत समिती करण्यात आली असून या समितीचे अध्यक्षपद प्रकाश जावडेकर यांच्याकडे सोपविण्यात आले आहे. या समितीमध्ये भाजपचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विनय सहस्रबुद्धे, भाजपमध्ये प्रवेश केलेले प्रसिद्ध बांधकाम व्यावसायिक डी. एस. कुलकर्णी, खासदार विष्णुपद राय, शिवसेनेचे खासदार राहुल शेवाळे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अनिरुद्ध देशपांडे, सामाजिक समरसता मंचाचे भिकुजी ऊर्फ दादा इदाते, सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे रणजित सावरकर, इतिहास संशोधक पांडुरंग बलकवडे, गणेश राऊत, माजी आमदार उल्हास पवार आणि अशोक मोडक यांच्यासह अंदमान येथील प्रशांत श्रोत्री, गोरख पाटील, अशोक साधू आणि संतोष माने या स्थानिक संयोजकांचा समावेश आहे. त्यामुळे हे संमेलन भाजप आणि संघाचे तर होणार नाही ना अशी चर्चा दबक्या आवाजात होत आहे.
सावरकर हे पक्षीय राजकारणापलीकडचे होते. त्यामुळे स्वागत समिती स्थापन करताना पक्षाचा विचार न करता केवळ सावरकरप्रेमींनाच यामध्ये स्थान देण्यात आले असल्याचे ऑफबीट डेस्टिनेशन्सचे नितीन शास्त्री यांनी सांगितले. जावडेकर हे केंद्रीय मंत्री आहेत यापक्षाही ते सावरकरप्रेमी आहेत. तर, राहुल शेवाळे यांनी सेल्यूलर जेल येथून काढून टाकण्यात आलेली सावरकरांची वचने पुन्हा लावण्यात यावी यासाठी पाठपुरावा केला आहे, असेही शास्त्री यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सत्तेभोवती फिरणारी संमेलने
साहित्य संमेलनामध्ये राजकीय व्यक्ती नकोत अशी भूमिका सातत्याने मांडली जात असली तरी राजकारण्यांशिवाय संमेलने होऊ शकत नाहीत हे वास्तव नाकारता येत नाही. घुमान येथे झालेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नितीन गडकरी आणि सुरेश प्रभू या केंद्रीय मंत्र्यांनी भरघोस मदत केली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे व्यासपीठावर होते. तर, यापूर्वी झालेल्या साहित्य संमेलनांवर राष्ट्रवादी काँग्रेसचा वरचष्मा होता. त्यामुळे साहित्य संमेलनेही सत्तेभोवती फिरणारी असतात याची प्रचिती आता विश्व साहित्य संमेलनाच्या माध्यमातून निदर्शनास येत आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chairman for welcome comm of vishwa sahitya sammelan prakash jawadekar
First published on: 20-07-2015 at 03:20 IST