पुणे : ‘मराठवाड्याला मागास म्हणण्याची आवश्यकता नाही. तो अग्रेसर आहे. सारखे मागास म्हणत राहिलो, तर आपणच मागे पडत असतो. त्यामुळे मराठवाड्यातील लोकांनी आता मागास नाही, तर आपण अग्रेसर आहोत, असे म्हणायला सुरुवात करायला हवी. तसे नसेल, तर अग्रेसर होण्यासाठी आत्मविश्वासाने प्रयत्न करायला हवेत,’ असे मत विधानपरिषदेचे सभापती राम शिंदे यांनी बुधवारी व्यक्त केले.

मराठवाडा समन्वय समितीच्या वतीने आयोजित ‘मराठवाडा मुक्तिदिन महोत्सवा’त शिंदे बोलत होते. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, समितीचे अध्यक्ष राजकुमार धुरगुडे पाटील, उपाध्यक्ष किशोर पिंगळीकर, सचिव दत्ता मेहेत्रे या वेळी उपस्थित होते.

याच कार्यक्रमात ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हरिश्चंद्र सुडे, पत्रकार राहुल कुलकर्णी, प्रशासकीय अधिकारी ओमप्रकाश यादव, उद्योजक राजेंद्र नारायणपुरे, कृषी क्षेत्रातील योगदाबद्दल दत्तात्रय जाधव आणि शिक्षण क्षेत्रासाठी संस्कृती संवर्धन मंडळ यांना ‘मराठवाडा भूषण’ पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच, संदीपान पवार यांनी संपादित केलेल्या ‘वैभवशाली मराठवाडा’ विशेषांकाचे प्रकाशन करण्यात आले.

शिंदे म्हणाले, ‘मराठवाडा मुक्त करण्यासाठी अनेकांनी योगदान दिले. त्यांचे स्मरण आपल्याला करावेच लागेल. वर्तमानकाळाला अनुसरून इतिहासाचे स्मरण केल्यास उज्ज्वल भविष्यासाठी प्रयत्न करता येते.’ मराठवाडा समन्वय समितीच्या कार्याचा गौरवही शिंदे यांनी केला. ‘समितीचे कार्य प्रेरणा देणारे आहे. सध्याच्या काळात १७ वर्षे एकच अध्यक्ष काम करतो,’ अशी मिश्किल टिपण्णी त्यांनी केली.

‘मराठवाड्याच्या नशिबी अनेक वर्षे अनेक जणांनी घातलेले निर्बंध आले. तेराव्या शतकात अल्लाउद्दीन खिलजीने शेतीवर निर्बंध घातले. मराठवाड्यातील लोकांना घोड्यावर बसू नका, असा फतवा काढला. हजार वर्षांपासून अधिक काळ वेगवेगळ्या आक्रमकांनी, इंग्रजांनी आपली संस्कृती बुडविण्याचा घाट घातला. मात्र, ती संपली नाही,’ असे बागडे यांनी सांगितले.

 ‘नव्या शिक्षणातूनच गरिबी हटू शकते’

‘मॅकोलेच्या शिक्षण पद्धतीने आपण इतिहास विसरलो. इथे अनेक शोध लागले. शिक्षणाची उज्ज्वल परंपरा या देशाला होती. देश स्वतंत्र झाल्यानंतर पहिल्यांदा शिक्षण पद्धतीत बदल करायला हवा, असे विनोबा भावे यांनी सांगितले होते. मात्र, तसा बदल झाला नाही. गरिबी हटवायची असेल, तर नव्या शिक्षण पद्धतीतूनच हटू शकते. बाकी कशातूनच नाही. त्यामुळे नव्या शिक्षण पद्धतीचा अवलंब करावा,’ असे आवाहन राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी केले.