scorecardresearch

कोकणात दोन दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता; उर्वरित राज्यात चार दिवस उन्हाचा चटका कायम राहण्याचा अंदाज

राज्यात उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक शहरांमधील कमाल तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे.

पुणे : राज्यात उन्हाच्या झळा चांगल्याच जाणवू लागल्या आहेत. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील अनेक शहरांमधील कमाल तापमानाचा पारा ४१ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस दक्षिण कोकणात विजांचा कडकडाट आणि मेघगर्जनेसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

उत्तर भारतातील राजस्थान, गुजरातचा कच्छ या भागात गेल्या आठ ते दहा दिवसांपासून तापमानाचा पारा ४५ अंशांच्या आसपास पोहोचला आहे. या भागाकडून राज्याकडे उष्ण वारे वाहत आहेत, तर बंगालच्या उपसागरात तयार झालेला कमी दाबाचा पट्टा अंदमान बेटाकडे सरकला आहे. या भागाकडूनही राज्याकडे बाष्पयुक्त वारे वाहत आहेत. त्यामुळे राज्यात तापमानाचा पारा वाढला आहे. तसेच ढगाळ वातावरण तयार झाले आहे. या दोन्ही स्थितीच्या प्रभावामुळे दमट वातावरण देखील तयार झाले आहे. परिणामी, कमाल तापमानात वाढ झाली आहे. ही स्थिती पुढील चार ते पाच दिवस राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. गेल्या २४ तासांत कोकण, गोवा आणि विदर्भात काही ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे. तसेच मराठवाडय़ात बऱ्याच ठिकाणी कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत किंचित वाढ झाली आहे. उर्वरित राज्यात कमाल तापमान सरासरीच्या जवळपास होते.

दरम्यान, पुणे शहर आणि परिसरात गेल्या चार ते पाच दिवसांपासून कमाल तापमानाचा पारा ३८ अंशांवर स्थिर असला, तरी सकाळी धुके, दुपारी कडक ऊन आणि सायंकाळनंतर ढगाळ वातावरण यामुळे घामाच्या धारा लागत आहेत. पुढील पाच दिवस शहरात दुपारनंतर ढगाळ वातावरण राहणार आहे. कोल्हापूर, साताऱ्यातील वाई आणि परिसरात, तर सांगली जिल्ह्याच्या पूर्व भागात गुरुवारी जोरदार पावसाने हजेरी लावली.

तापमान : कमाल आणि किमान 

मुंबई ३४.५-२४.८, रत्नागिरी ३१.९-२५, डहाणू २४.७-२६.५, पुणे ३८-२२.३, कोल्हापूर ३६.१-२३.९, महाबळेश्वर २८.६-२०.२, नाशिक ३७.२-२४, सांगली ३६.२-२४.३, सातारा ३६.४-२४.१, सोलापूर ३९.५-२८, औरंगाबाद ३८.५-२३.५, परभणी ४०.३-२५, अकोला ४१.६-२७, अमरावती ४१.४-२४.३, गोंदिया ३९.२-१९.८ आणि नागपूर ३९.६-२३.३

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Chance rain two days thunderstorms konkan rest state heat wave expected continue four days amy

ताज्या बातम्या