पुणे : शिवसेनेतील बंडखोरीमागे भाजपाचा हात असल्याचा आरोप सातत्याने होत आहे. गुवाहटीमधील बंडखोरांकडून २/३ आमदारांच्या पाठिंब्याचा दावा केला जात आहे. तसेच राज्यातील महाविकासआघाडी सरकार अल्पमतात असल्याचाही दावा केला जातोय. या पार्श्वभूमीवर भाजपाचे प्रदेशाध्य चंद्रकांत पाटील यांना महाराष्ट्रातील राजकीय परिस्थिती पाहता भाजपा स्थिर सरकार द्यायला पुढे येणार का असा प्रश्न विचारण्यात आला. यावर चंद्रकांत पाटील यांनी नाही म्हणत भाजपाने भूमिका स्पष्ट करण्यासारखं काहीही घडलेलं नाही, असं मत व्यक्त केलं. ते पुण्यात पत्रकारांशी बोलत होते.

राज्यात स्थिर सरकार द्यायला भाजपा पुढे येणार का? या पत्रकारांच्या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले, “नाही, भाजपाने आपली भूमिका स्पष्ट करावी अशी कुठलीही गोष्ट अजून घडलेली नाही. जे चाललं आहे त्याकडे स्वाभाविकपणे आम्ही राजकीय पक्ष म्हणून बारकाईने पाहत आहोत. राज्य सरकारच्या स्थिरतेबद्दल बोलण्यासारखं सध्या काहीच घडलेलं नाही.”

“सरकार स्थिर आहे की अस्थिर आहे याकडे भाजपाचं लक्ष नाही”

“महाराष्ट्रात एक राजकीय परिस्थिती निर्माण झाली आहे. मात्र, भाजपा आपलं दैनंदिन काम चालवत आहे. सरकार स्थिर आहे की अस्थिर आहे याकडे भाजपाचं लक्ष नाही. आम्ही दैनंदिन काम करत आहोत,” असंही चंद्रकांत पाटील यांनी नमूद केलं.

हेही वाचा : राजकीय उलथापालथीच्या पार्श्वभूमीवर बैठकांचं सत्र, काँग्रेस नेते आणि शरद पवारांमध्ये सिल्व्हर ओकवर चर्चा

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

“देवेंद्र फडणवीस यांच्या कामाला वेग आहे”

फडणवीसांच्या दिल्ली वाऱ्या वाढल्या आहेत का? या प्रश्नावर चंद्रकांत पाटील म्हणाले, “देवेंद्र फडणवीस यांच्या दिल्ली भेटी या नियमत आहेत. माध्यमांना आत्ता त्या लक्षात येत आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या कामाला वेग आहे. ते त्यांना हवी असलेली दिल्लीतील बैठकीची वेळ मिळाली की उद्या जाऊ, परवा जाऊ असं न करता रात्री-बेरात्री निघतात. त्यांच्या दिल्लीतील बैठका नेहमीच जास्त होत्या, माध्यमांना आत्ता लक्षात आलं.”