पुणे : ‘काँग्रेसच्या केंद्रीय नेतृत्वाकडे विकासाचे कोणतेही स्पष्ट ध्येय नाही. काँग्रेसकडे ना देशासाठी भूमिका आहे, ना राज्यासाठी. त्यामुळे काँग्रेसमधील कार्यकर्ते नाराज असून त्यांचे भारतीय जनता पक्षात स्वागत केले जात आहे. मात्र, भाजपच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची संमती घेऊनच नव्या कार्यकर्त्यांना पक्षात घेतले जात आहे,’ असे महसूलमंत्री आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी सोमवारी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बावनकुळे यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी एका प्रश्नाला उत्तर देताना काँग्रेसचे स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. ‘विकसित महाराष्ट्रासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना साथ देण्यासाठी हे कार्यकर्ते भाजपमध्ये प्रवेश करत आहेत. देशात पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवूनच हे प्रवेश होत असून, निष्ठावंत कार्यकर्त्यांची संमती घेऊनच या कार्यकर्त्यांना पक्षात घेतले जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.’
काँग्रेसच्या केंद्र तसेच राज्याच्या नेतृत्वाकडे स्पष्ट दूरदृष्टी नसल्याने स्थानिक पातळीवरील कार्यकर्ते नाराज आहेत. हे कार्यकर्ते विकासाला प्राधान्य देणारे असल्याने त्यांना भाजपमध्ये प्रवेश दिला जात असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले. राज्य सरकारने निवडणुकीपूर्वी जो संकल्प केला आहे. तो पूर्ण करण्यासाठी पाच वर्षांचा कालावधी असल्याचे ते म्हणाले.
‘शिरसाटांचे वक्तव्य ऐकले नाही’
सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी निधी वळविल्याबद्दल व्यक्त केलेल्या नाराजीबाबत बावनकुळे यांना विचारले असता, ते म्हणाले, ‘शिरसाट नेमके काय म्हणाले ते मी पाहिलेले नाही. मात्र, पैशांचे सोंग करून चालणार नाही. उत्पन्नाचे नवीन स्रोत शोधावे लागणार आहेत. यासाठी केंद्र सरकारकडून मदत घेण्याचा विचार आहे. सामाजिक न्याय विभागात, विशेषतः आदिवासी भागांतील लाभार्थ्यांना मदत करणे हे सरकारचे कर्तव्यच आहे.