पुणे : राष्ट्रीय परीक्षा प्राधिकरणाने (एनटीए) संयुक्त प्रवेश परीक्षा मुख्य (जेईई मेन्स) परीक्षेच्या तारखांमध्ये बदल केला आहे. आता जेईई मुख्य परीक्षा ४ ते १२ एप्रिल या कालावधीत होणार आहे. एनटीएने परीक्षा होणाऱ्या शहरांबाबतचा आगाऊ तपशील जाहीर केला. त्यातून परीक्षेच्या तारखांमधील बदल स्पष्ट झाला आहे. आधीच्या नियोजनानुसार दुसऱ्या सत्राची जेईई मुख्य परीक्षा ४ ते १५ एप्रिल या कालावधीत होणार होती. नव्या वेळापत्रकानुसार अभियांत्रिकी पदवी, तंत्रज्ञान पदवी अभ्यासक्रमासाठीचा पेपर १ ४, ५, ६, ८ आणि ९ एप्रिल रोजी सकाळी नऊ ते दुपारी बारा, दुपारी तीन ते सायंकाळी सहा या वेळेत होणार आहे.

तर वास्तूकला पदवी, नियोजन पदवी अभ्यासक्रमासाठीचा पेपर दोन १२ एप्रिलला सकाळी नऊ ते दुपारी १२.३० या वेळेत होणार आहे. ही परीक्षा परदेशातील २२ शहरांसह देशभरातील अंदाजे ३१९ शहरांतील विविध परीक्षा केंद्रांवर होणार आहे. परीक्षेचे प्रवेशपत्र परीक्षेच्या तीन दिवस आधी प्रसिद्ध केले जाणार असल्याची सूचना एनटीएने नमूद केली आहे. अधिक माहिती  jeemain.nta.ac.in, jeemainsession2.ntaonline.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Changes in joint entrance examination main exam dates by national examination authority pune print news ccp 14 amy
First published on: 29-03-2024 at 03:08 IST