पुणे : पुणे महापालिकेत नोकरीच्या आमिषाने सात लाख ३० हजारांची फसवणूक केल्याप्रकरणी कोल्हापुरातील एकास अटक करण्यात आली. हिम्मतराव बाळासाहेब निंबाळकर (वय ३४, रा. मंगरायाची वाडी, वडगाव, जि. कोल्हापूर) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. याबाबत एका महिलेने फिर्याद दिली आहे. तक्रारदार तरुणी बारामतीतील आहे. निंबाळकरने मंत्रालयात नोकरी करत असल्याची बतावणी अनेकांकडे केली होती. निंबाळकरचा नातेवाईक बारामतीतील एका रुग्णालयात उपचार घेत होता. महिलेच्या पतीचे बारामतीत ओैषध विक्रीचे दुकान आहे. त्या वेळी त्याची महिला आणि तिच्या पतीशी ओळख झाली होती. त्या वेळी त्याने पुणे महापालिकेच्या आरोग्य विभागात नोकरी लावण्याचे आमिष महिला आणि तिच्या पतीला दाखविले होते. त्यांनी निंबाळकरला एक लाख रुपये दिले होते.

त्यानंतर त्याने रुग्णालायतील आणखी सहा जणांकडून नोकरीच्या आमिषाने पैसे घेतले होते. निंबाळकरने महिलेसह सात जणांकडून सात लाख रुपये ३० हजार रुपये घेतले होते. दरम्यान, निंबाळकरने शुक्रवारी (१९ ऑगस्ट) महिलेसह सात जणांना महापालिकेत बोलाविले होते. उमेदवारांची मुलाखत होणार असल्याची बतावणी त्याने केली होती. महिलेसह सात उमेदवार महापालिकेत आले. त्या वेळी निंबाळकर तेथे आला होता. महिलेसह उमेदवारांनी सुरक्षारक्षकाकडे मुलाखतीबाबत विचारणा केली. तेव्हा मुलाखत होणार नसल्याचे त्यांना सुरक्षारक्षकाने सांगितले. महिलेला संशय आल्याने तिनेे त्वरीत शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. पोलिसांनी निंबाळकरला महापालिकेच्या आवारात पकडले. सहायक पोलीस निरीक्षक भोलेनाथ अहिवळे तपास करत आहेत.