पुणे : हिंजवडीतील राजीव गांधी आयटी पार्क परिसरात वाहतूक कोंडी, अतिक्रमण, पूरस्थिती अशा समस्या आहेत. या समस्या सोडविण्यासाठी पुणे महापालिका, पिंपरी-चिंचवड महापालिका, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने (एमआयडीसी) योग्य समन्वयाने नियोजन करावे. उपलब्ध संसाधनाद्वारे नागरिकांना चांगली सेवा देण्यास प्राधान्य द्यावे. विविध समस्यांवर तोडगा काढून कामे वेळेत पूर्ण होण्यासाठी बृहत आराखडा सादर करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरूवारी दिले.
हिंजवडी आयटी पार्कमधील नागरी समस्यांबाबत विधानभवनमध्ये आयोजित बैठकीत मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, राज्यमंत्री माधुरी मिसाळ, आमदार शंकर जगताप, आमदार शंकर मांडेकर, आमदार महेश लांडगे, नगरविकास विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव असिमकुमार गुप्ता, प्रधान सचिव गोविंदराज, विभागीय आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार, जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी, पुणे महापालिका आयुक्त नवलकिशोर राम, पिंपरी-चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीए आयुक्त योगेश म्हसे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील, उद्योग विकास आयुक्त पी. वेलारासू यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, हिंजवडी आयटी पार्क परिसरातील वाहतूक कोंडीमुळे हजारो आयटी अभियंते, नागरिक त्रस्त झाले आहेत. पावसाळ्यात कोंडीत भर पडत आहे. या भागात रस्ते, रिंगरोड, उड्डाणपूल, सार्वजनिक वाहतूक, पार्किंग यंत्रणा, मेट्रोची प्रलंबित कामे मार्गी लागण्यासाठी तातडीने उपाययोजना करा. कस्पटेवस्ती ते हिंजवडी टप्पा तीनपर्यंतचा रस्ता वेगळा केल्यास वाहतुकीने होणारी गर्दी कमी होईल. सर्व रस्ते सिमेंट काँक्रिटचे करावेत. म्हाळुंगे आयटी सीटीचा प्रलंबित प्रस्ताव त्वरित मंजूर करावा. रस्ते रूंदीकरणासाठी योग्य मोबदला देऊन लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन भूसंपादन करावे. हिंजवडी उन्नत मार्गाचे काम सहा पदरी करून याबाबत १५ दिवसांत निर्णय घ्यावा.
रस्ता रूंदीकरणाला प्राधान्य
सूर्या हॉस्पिटल ते माण गावठाण, म्हाळुंग ते हिंजवडी टप्पा एक, शनि मंदिर वाकड ते मारूंजी, नांदे ते माण या रस्त्यांची रूंदीकरणाच्या कामाला यंत्रणांनी प्राधान्य द्यावे. शिवाजीनगर ते हिंजवडी कॉरिडॉरचा आराखडा तयार करावा. वाकड-बालेवाडी भागात सार्वजनिक वाहतूक केंद्र उभारावे, यामुळे प्रवासी विभागले जावून गर्दी नियंत्रणात राहील. गर्दी वाढल्याने नागरिक रस्त्यावर येणार नाहीत, यासाठी पदपथांचा विषय दोन्ही महापालिकांनी मार्गी लावावा. पाटीलवस्ती ते बालेवाडी रस्ता येथील भूसंपादनाबाबत महिनाभरात काम करावे, अशा सूचनाही मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिल्या.
आयटी पार्कमध्ये पावसाचे पाणी वाहून जाण्यासाठी पुढील वर्षांपर्यंत अभ्यास करून योग्य प्रवाह होण्यासाठी नियोजन करा. योग्य त्याठिकाणी सांडपाणी वाहिन्या टाकण्याची कार्यवाही हाती घ्यावी. सर्व कामांसाठी विभागीय आयुक्तांनी समन्वय करून बैठका घ्याव्यात. – देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
हिंजवडी परिसरातील वाहतूक कोंडी सार्वजनिक वाहतूक व्यवस्था वाढली तर कमी होईल. यासाठी मेट्रोची कामेही त्वरित होणे आवश्यक आहे. मेट्रो स्थानकांची कामे डिसेंबरपर्यंत पूर्ण करावीत. मेट्रो मार्गिकेमुळे रस्ता छोटा होणार असल्याने एमआयडीसी, पीएमआरडीए, मेट्रो यांनी एकत्र समन्वयाने विषय मार्गी लावावा. – अजित पवार, उपमुख्यमंत्री