तीन वर्षांपासून पक्षाघाताचे झटके आणि अशक्तपणा अशा लक्षणांनी ग्रासलेल्या आठ वर्षांच्या मुलाला शस्त्रक्रियेतून जीवदान देण्यात मेंदुविकार तज्ज्ञांना यश आले आहे. ‘ॲनास्टोमोसिस’ असे या शस्त्रक्रियेचे नाव असून रुग्णाच्या आजाराला वैद्यकीय परिभाषेत ‘मोयामोया’ असे संबोधण्यात येते. मेंदुविकारांतील हा एक दुर्मीळ प्रकार समजला जातो.
बाणेर येथील मणिपाल रुग्णालयात पक्षाघाताचा मोठा झटका आणि त्यानंतर आलेला अशक्तपणा यांवरील उपचारांसाठी सदर आठ वर्षीय रुग्णाला दाखल करण्यात आले होते. आवश्यक तपासण्यांनंतर त्याला मोयामोया या आजाराने ग्रासल्याचे निदान झाले. या आजारामध्ये मेंदूच्या दोन्ही भागांना होणारा रक्तपुरवठा मर्यादित होतो. आजाराचे स्वरुप लक्षात येताच रुग्णालयाचे मेंदुशल्यविशारद डॉ. अमित धाकोजी यांनी मेंदूतील रक्तपुरवठा सुरळीत करणारी शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला आणि ती यशस्वी केली.
हेही वाचा: पुणे: एमपीएससीतील सदस्यांअभावी स्पर्धा परीक्षेच्या मुलाखतींना फटका
मोयामोया हा मेंदूच्या विकासाशी संबंधित आजार आहे. यामध्ये मेंदूला रक्तपुरवठा करणारी मुख्य फीडर धमनी अरुंद होते आणि त्यामुळे मेंदूच्या दोन्ही भागांना होणारा रक्तपुरवठा कमी होतो. या आजारामागील कारण अज्ञात आहे. मात्र, या आजारामुळे रक्तपुरवठा कमी होतो. त्यामुळे अनेक झटके येतात. अशक्तपणा येतो. वेळेवर निदान आणि उपचार न झाल्यास रुग्णाला कायमचा अर्धांगवायू होऊ शकतो. ही समस्या दूर करण्यासाठी केल्या जाणाऱ्या शस्त्रक्रिया क्लिष्ट असू शकतात. या आठ वर्षांच्या रुग्णाच्या धमनीचा आकार अत्यंत लहान असल्याने बायपास शस्त्रक्रिया करणे जटील होते.
हेही वाचा: पुणे: भूमी अभिलेख भरती परीक्षा निकाल १५ डिसेंबरला; यंदा प्रथमच प्रतीक्षा यादी
या आजारावर कायमस्वरूपी उपचार नाहीत. भविष्यातील झटक्यांची शक्यता टाळण्यासाठी रुग्णांना रक्तपातळ करणारे औषध दिले जाते. या आजारासाठी उपलब्ध एकमेव निश्चित उपचार हा बायपास शस्त्रक्रियेचा आहे. या आठ वर्षीय रुग्णाला आमच्याकडे आणण्यापूर्वी अनेक ठिकाणी दाखल करण्यात आले होते. त्यावेळी त्याच्यावर अप्रत्यक्ष शस्त्रक्रिया करण्याचे ठरवण्यातही आले होते, मात्र आजाराची तीव्रता, रुग्णाचे वय आणि झटक्यांची वारंवारता पाहता थेट बायपास करण्याची गरज होती. कानासमोरील बाजूवर असलेली टेम्पोरल धमनीचे या शस्त्रक्रियेत आव्हान होते, मात्र ते यशस्वीपणे पेलणे शक्य झाले आणि रुग्ण ठणठणीत बरा झाला. – डॉ. अमित धाकोजी, मेंदुशल्यविशारद