पुणे : ‘पूर्वीची पिढी साहस, अद्भुत, रम्य अशा रंगांमध्ये रममाण होती. पण सध्याची मुले मोबाईल, इंटरनेट माध्यमातून आभासी जगात रमतात. ही साधने मुलांच्या निकोप वाढीसाठी उपयुक्त नाहीत. अशा आभासी जगामध्ये गुंतलेल्या मुलांना वास्तव जगामध्ये आणण्याचे काम अवघड असून त्यासाठी सकस बालसाहित्याची निर्मिती करून मुलांना वाचनाकडे वळविण्याचे प्रयत्न हा उलटा प्रवास करावा लागणार आहे’, असे मत राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष डाॅ. सदानंद मोरे यांनी शुक्रवारी व्यक्त केले.

अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्थेच्या सुवर्णमहोत्सवी सांगता समारंभात ‘बालकुमार सुवर्णगाथा स्मरणिके’चे प्रकाशन डाॅ. सदानंद मोरे यांच्या हस्ते झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते गिरीश प्रभुणे, अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष प्रा. मिलिंद जोशी, संस्थेचे अध्यक्ष माधव राजगुरू, कार्याध्यक्ष अनिल कुलकर्णी, कार्यवाह प्रसाद भडसावळे, कोषाध्यक्ष संजय ऐलवाड या वेळी उपस्थित होते. साहित्य अकादमीच्या बालसाहित्य पुरस्कार प्राप्त लेखकांचा तसेच बालकुमार साहित्य संमेलनाच्या माजी अध्यक्षांचा या वेळी सत्कार करण्यात आला.

मोरे म्हणाले, ‘कृत्रिम बुद्धिमत्तेबाबत सध्या बरीच चर्चा आहे, पण या मुद्द्याकडे गांभीर्याने बघण्याची आवश्यकता आहे. साहित्याच्या माध्यमातून वास्तवतेची जाणीव कशी करून देता येईल या दृष्टीने विचार होणे आवश्यक आहे.’

जोशी म्हणाले, ‘गेल्या काही वर्षांत काळ झपाट्याने बदलला आहे. तरी शाश्वत मूल्ये कधी बदलणार नाही. अस्वस्थ वर्तमानात मुलांची मने कोमेजणार नाहीत याची दक्षता लेखकांना घ्यावी लागणार आहे. मुलांच्या शालेय वेळापत्रकात अवांतर वाचन आणि खेळाला कुठेही स्थान नाही. भाषा, साहित्य आणि वाचनाची गोडी लावण्याची जबाबदारी शिक्षकांना घ्यावी लागेल“

प्रभुणे म्हणाले, ‘पालकांनीच वाचन सोडल्यामुळे आणि दृकश्राव्य माध्यमांमुळे मुलांना पुस्तके वाचनाची आवड आणि गोष्टी ऐकण्याची सवय राहिलेली नाही. अशा मुलांमध्ये मूक-कर्णबधिरता वाढीस लागल्याचे जाणवत आहे. शालेय मुलांना कविता वाचून, गाऊन दाखविल्या जात नसल्यामुळे शिक्षकही गतीमंद झाले आहेत. लहान मुलांची कल्पनाशक्ती वाढीस लागण्याच्या दृष्टीने, मुलांपर्यंत पुस्तके पोहोचविण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत.’

महाराष्ट्रामध्ये गाथा या शब्दाला सांस्कृतिक महत्त्व आहे. गाथा सप्तशती, तुकोबांची गाथा असे म्हटले जाते. गाथा ही अशी आहे की ती बुडवली तरी बुडत नाही. या स्मरणिकेतील भा. रा. भागवत यांचे भाषण वाचले आणि त्याचा विस्तार करायचा ठरवले तर मराठी बालसाहित्याचा बृहद इतिहास लिहिता येईल. – डॉ. सदानंद मोरे, अध्यक्ष, राज्य साहित्य संस्कृती मंडळ