आज आंतरराष्ट्रीय बालमजुरी विरोधी दिन

पुणे : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या टाळेबंदीमुळे कचरावेचकांची मुले शाळेतून बाहेर पडण्याचा धोका निर्माण झाला आहे. शनिवारी (१२ जून) आंतरराष्ट्रीय बालमजुरी विरोधी दिन साजरा होत असताना शिक्षणापासून दूर राहून कचरावेचकाचे काम करणाऱ्या मुलांच्या संख्येमध्ये वाढ झाल्याचे वास्तव समोर आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कागद-काच-पत्रा कष्टकरी पंचायत आणि ‘स्वच्छ’ संस्थांद्वारे ‘मिस कलेक्ट’ प्रकल्पांतर्गत मार्च, एप्रिल आणि मे अशा तीन महिन्यांमध्ये सर्वेक्षण मोहीम राबविण्यात आली. कचरावेचकांच्या मुलांची सद्य:स्थिती समजणे आणि मुलांच्या कामावर येण्यामागचे कारण जाणून घेण्याच्या उद्देशातून करण्यात आलेल्या सर्वेक्षणामध्ये ३ हजार ३९९ कचरावेचक सहभागी झाले होते. कचरावेचकांची २१४ मुले त्यांच्यासमवेत कामाच्या ठिकाणी येत असल्याचे आढळून आले. या संख्येमध्ये १५३ मुले असून ६१ मुलींचा समावेश आहे.

बालमजुरीवर मात करण्यासाठी पुढचे पाऊल आणि नियोजन या विषयांसंदर्भात कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते.  मुलांचा अभ्यास घेणे आणि अभ्यास करू शकतील अशी सुरक्षित जागा उपलब्ध करून द्यावी, अशी इच्छा त्यांनी प्रदर्शित केली. शाळा सुरू झाल्यानंतर सर्व मुलांनी शाळेत प्रवेश घेतला आहे याची खात्री करावी लागेल, असे हडपसर भागातील कचरावेचक राणी शिवशरण यांनी सांगितले. वस्तीमध्ये राहणाऱ्या कष्टकरी पालकांच्या मुलांना पाळणाघराची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शासनाकडे करण्याचे आवाहन त्यांनी केले.

शाळा बंद असल्याने आणि वस्ती सुरक्षित नसल्याने मी आईला कचरा निवडण्यामध्ये मदत करते. शाळा सुरू झाल्यानंतर मी शिकणार असून नृत्यकलेची आवड जोपासणार आहे.

– मयूरी धावरे, कचरावेचक पालकाची मुलगी (इयत्ता सातवी)

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Children of garbage pickers at risk of dropping out of school due to lokdown zws
First published on: 12-06-2021 at 02:02 IST