शिवसेना नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर पुण्यातील एका तरुणीने लैंगिक अत्याचार आणि गर्भपात केल्याचा आरोप केला होता.यामुळे मागील दोन महिन्यापासून चांगलेच राजकारण तापले होते. त्यामध्ये भाजपच्या नेत्या उपाध्यक्षा चित्रा वाघ यांनी उडी घेतली होती. त्या या प्रकरणावर सतत भूमिका मांडत होत्या. मला गोव्यात चित्रा वाघ यांनीच डांबून ठेवले होते, अशी भूमिका पीडित तरुणीने काल मांडली होती. यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली.


त्या पार्श्वभूमीवर पीडित तरुणीचा राजकीय फायद्यासाठी वापर केल्याच्या निषेधार्थ आज पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर चौकात चित्रा वाघ यांच्या फोटोला जोडे मारो आंदोलन करण्यात आले.तर यावेळी जोरदार घोषणाबाजी देखील करण्यात आली. यावेळी राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या शहर अध्यक्षा सुषमा सातपुते म्हणाल्या की, चित्रा वाघ यांना पक्षात कोणत्याही प्रकारच स्थान नसल्याने,अशा प्रकारे एका युवतीच्या भावनेचा वापर केला गेला आहे. ही निषेधार्ह बाब असून स्वतः च्या राजकीय फायद्यासाठी त्यांनी एखाद्या युवतीचा फायदा घेऊ नये.


तसेच चित्रा वाघ या मानसिकरित्या आजारी असल्याने त्यांना मनोरुग्णालयात पाठविण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. तसेच चित्रा वाघ यांच्या विरोधात कारवाई झाली पाहिजे,अशी मागणी त्यांनी केली.तर कारवाई न झाल्यास वेळ प्रसंगी त्यांच्या तोंडाला काळे फासून, रस्त्यावरून धिंड काढू,असा इशारा त्यांनी यावेळी दिला.