पुणे : राजीव गांधी आयटी पार्क परिसरातील नागरी समस्या सुटत नसल्याने त्याचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत करावा, अशी मागणी आयटीयन्सनी केली होती. याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सकारात्मक असल्याची माहिती भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी सोमवारी रात्री एक्स या मंचावरून दिली.
याबाबत लांडगे यांनी म्हटले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी हिंजवडी आयटी पार्कसाठी सकारात्मक पाऊल उचलले आहे. हिंजवडी आयटी पार्कमध्ये सध्या पायाभूत सुविधांची समस्या निर्माण झाली आहे. या प्रकरणी मुख्यमंत्र्यांनी विशेष बैठक घेतली. आयटी पार्कसह इतर गावांचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत करण्याबाबत ते सकारात्मक आहेत.
हिंजवडी आयटी पार्कमध्ये खराब रस्ते, पावसाळ्यात पाण्याचा निचरा न होणे यांसह अनेक समस्या आहेत. आयटी पार्कची जबाबदारी विविध शासकीय यंत्रणांमध्ये विभागलेली आहे. त्यात पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (पीएमआरडीए), महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), पिंपरी-चिंचवड महापालिका, स्थानिक ग्रामपंचायती अशा विविध शासकीय यंत्रणांचा समावेश आहे. या यंत्रणांमध्ये योग्य समन्वय नसल्याने आयटी पार्कमधील नागरी समस्या सुटण्याऐवजी त्यात भर पडते. यंदा पावसाळ्यात आयटी पार्कमधील रस्त्यांवर पाणी साचून त्याचे रूपांतर ‘वॉटर पार्क’मध्ये झाले. त्यामुळे आयटी पार्कचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत करावा, अशी मागणी आयटीयननी केली होती.
या मागणीला आयटी पार्कमधील हिंजवडी, माण या स्थानिक ग्रामपंचायतींनी तीव्र विरोध दर्शविला होता. आयटी पार्कमधील समस्यांचा मुद्दा भरकटविला जात असल्याचा दावाही ग्रामपंचायतींनी केला होता. आयटी पार्क परिसरातील समस्या सोडविण्यासाठी संबंधित सर्व शासकीय यंत्रणांमध्ये योग्य समन्वय गरजेचा असल्याची त्यांची भूमिका होती. याचबरोबर आयटी पार्कमधील एमआयडीसीच्या हद्दीत नागरी सुविधांची समस्या गंभीर असून, ग्रामपंचायतींच्या हद्दीत रस्त्यांसह इतर सुविधा चांगल्या आहेत, याकडेही त्यांनी लक्ष वेधले होते.
मोहिमेत २५ हजारांहून अधिक जणांचा सहभाग
आयटी पार्कमध्ये सुमारे पाच लाख आयटी कर्मचारी काम करतात. आयटी पार्कमधील नागरी समस्या सोडविण्यासाठी त्याचा समावेश पिंपरी-चिंचवड महापालिकेत करावा, अशी मागणी फोरम फॉर आयटी एम्प्लॉइज महाराष्ट्र संघटनेने केली होती. यासाठी ऑनलाइन स्वाक्षरी मोहीम सुरू करण्यात आली होती. या मोहिमेत २५ हजारांहून अधिक आयटीयन या मोहिमेत सहभागी झाले होते. त्यांनी याबाबत मुख्यमंत्र्यांकडे मागणी केली होती.