आद्यक्रांती गुरू लहुजी साळवे यांनी देशातील तरुणांना दिशा देण्याचे काम केले. त्यांचे जीवन चरित्र प्रत्येक नागरिकापर्यंत पोहचण्याची गरज आहे, अशी भावना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली. पुण्यातील संगमवाडी येथे आद्यक्रांती गुरू लहुजी साळवे यांच्या जयंतीनिमित्त ते बोलत होते. सध्याची पिढी तरुण पुस्तकांपासून दूर जात आहे. ही भीषण परिस्थिती बदलण्यासाठी लहुजी साळवे यांचे साहित्य समोर आणण्याची गरज आहे. यासाठी राज्य सरकार लहुजी साळवे यांचा जीवन प्रवास चित्रपटाच्या माध्यमातून मांडणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
फडणवीस म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात आद्यक्रांती गुरू लहुजी साळवे यांनी तरुण वर्गाला आणि प्रत्येक समाजाला दिशा देण्याचे काम केले. त्यांच्या कार्यामुळे देशात क्रांती घडली. त्याचे कार्य विसरता कामा नये. ज्या प्रकारे रायगडावर जाऊन छत्रपती शिवाजी महाराज, चैत्यभूमीवर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले जाते, तसेच यापुढील काळात लहुजी साळवे यांनाही अभिवादन करण्याची गरज आहे. या ठिकाणी येऊन एक प्रकारे ऊर्जा मिळते, असेही ते म्हणाले.
राज्य सरकार याठिकाणी उत्तम दर्जाचे स्मारक उभारणार असून लवकरात लवकर हे स्मारक कसे उभारले जाईल, यासाठी विशेष प्रयत्न केले जातील, असे आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिले. या स्मारकाच्या जागेवर काहींचा डोळा होता. त्यामुळे जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांना विशेष सूचना करत विकास आरखड्याच्या माध्यमातून जागा आरक्षित केल्याचेही त्यांनी सांगितले. यावेळी खासदार अनिल शिरोळे, सामाजिक न्यायराज्यमंत्री दिलीप कांबळे, आमदार भीमराव तापकीर,विजय काळे,सभागृह नेते श्रीनाथ भिमाले तसेच अन्य पदाधिकारी उपस्थित होते.