पुणे : ‘यवत येथील एका व्यक्तीने समाजमाध्यमात चुकीचे स्टेटस ठेवल्यामुळे तणाव निर्माण झाला. मात्र, तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे. जाणीवपूर्वक तणाव निर्माण झाला पाहिजे, यासाठी काही लोक असे ‘स्टेटस’ ठेवून अशा घटना घडवित आहेत. कोणालाही सोडले जाणार नाही. संबंधितांवर कठोर कारवाई केली जाईल,’ असा इशारा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या वतीने दिल्या जाणाऱ्या लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान कार्यक्रमानंतर फडणवीस यांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘तणाव निर्माण झाल्याने पोलिसांना सौम्य लाठीमार करावा लागला. मात्र, आता तेथील परिस्थिती नियंत्रणात आहे. अशी घटना घडविणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. सभा झाल्यानंतर असे ‘स्टेटस’ ठेवण्याची मुभा कोणालाही नाही. धर्मावर टीका करण्याचे अधिकारही कोणाला नाहीत. सभेचा आणि या घटनेचा कोणताही संबंध नाही. सभा झाली म्हणून असे कृत्य केले असे कोणी म्हणत असेल, तर ते सहन केले जाणार नाही.’

‘समाजमाध्यमातून पुढे आलेल्या चित्रफिती नेमक्या तेथील आहेत, की बाहेरच्या आहेत, हे पाहावे लागेल. त्यामुळे या सर्व गोष्टींची सखोल चौकशी केली जाईल,’ असे फडणवीस यांनी सांगितले.