पुण्यातील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील (सीओईपी) विद्यार्थ्यांनी तयार केलेला ‘स्वयम्’ हा उपग्रह बुधवारी सकाळी इस्रोच्या साह्याने अवकाशात झेपावला आणि या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांच्या गेल्या काही वर्षांच्या प्रयत्नांना यश आले. बुधवारी सकाळी तब्बल २० विविध उपग्रहांना घेऊन पीएसएलव्ही-सी३४ या प्रक्षेपकाने श्रीहरिकोटा येथून यशस्वी उड्डाण केले. याच प्रक्षेपकातून पुण्यातील विद्यार्थ्यांनी बनवलेला स्वयम हा उपग्रही अवकाशात झेपावला. हे प्रक्षेपण पाहण्यासाठी विद्यार्थ्यांसह अनेकानी बुधवारी महाविद्यालयात गर्दी केली होती.
वाचा : ऐतिहासिक..! ‘इस्रो’कडून एकाच वेळी २० उपग्रहांचे यशस्वी प्रक्षेपण
‘स्वयम्’ या उपग्रह निर्मिती प्रकल्पाची सुरुवात २००८ मध्ये झाली. तेव्हापासून विद्यार्थ्यांच्या प्रयत्नातून आणि संकल्पनेतून हा उपग्रह साकारला आहे. जुने विद्यार्थी महाविद्यालयातून बाहेर पडतानाच नवी फळी तयार होते. काम करणाऱ्या आजी विद्यार्थ्यांबरोबरच माजी विद्यार्थ्यांनीही या प्रकल्पात मदत केली. एकूण १७६ विद्यार्थ्यांच्या संघाने ‘स्वयम्’ची निर्मिती केली आहे. या उपग्रहाचे वजन हे ९९० ग्रॅम असून, त्याच्या निर्मितीसाठी ५० लाख रुपये खर्च आला आहे. उपग्रहाचे आज प्रक्षेपण झाल्यानंतर पुढील १५ दिवसांनी सीओईपीमध्ये उभारण्यात आलेल्या नियंत्रण कक्षाच्या संपर्कात हा उपग्रह येईल, अशी माहिती सीओईपीचे संचालक भारतकुमार आहुजा यांनी दिली. स्वयमच्या प्रकल्प समन्वयक डॉ. मनीषा खळदकर, डॉ. संदीप मेश्राम आहेत. स्वयमतर आता पृथ्वीच्या वातावरणातील काही घटकांचा अभ्यास करण्यासाठी पतंगाप्रमाणे असणारे उपग्रह तयार करण्याचा प्रकल्प सीओईपीने सुरू केला आहे. पुढील तीन-चार वर्षांत हा प्रकल्प पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. हवेत वेगवेगळ्या स्तरावर असलेल्या थरांचा अभ्यास करणे, हा याचा उद्देश आहे. याचा उपयोग मुख्यत्वे संशोधनासाठी होणार आहे. जगात पहिल्यांदाच अशा प्रकारचा उपग्रह तयार केला जाणार असल्याचे डॉ. खळदकर यांनी सांगितले.