सध्याचे खर्चिक विवाह सोहळे पाहिल्यानंतर चीड येते. संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन पाहिले की त्याची घृणा वाटते, असे प्रतिपादन माजी खासदार व साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी चिंचवडला केले. राजकीय क्षेत्रातील व्यक्ती एकांगी असतात, त्यांनी अन्य क्षेत्रातही डोकावण्याची गरज आहे, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने गडाख व शारदा गडाख यांना यशवंत-वेणू पुरस्काराने गौरवण्यात आले, तेव्हा ते बोलत होते. या समारंभात मयूर कलाटे व स्वाती कलाटे यांना यशवंत-वेणू युवा सन्मानाने तर सचिन यादव यांना सह्य़ाद्री पुरस्काराने गौरवण्यात आले. यावेळी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष डॉ. नागनाथ कोत्तापल्ले, माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य, कैलास आवटे आदी उपस्थित होते.
वाकड येथील ‘धनाढय़’ कलाटे परिवारातील मयूर व स्वाती यांनी साधेपणाने आळंदीत लग्न केल्याचा संदर्भ मनोगतात व्यक्त केला. त्याचा संदर्भ देत गडाख म्हणाले, युवकांमध्ये प्रगल्भता आली असून घरची परिस्थिती उत्तम असतानाही साधेपणाने लग्न करण्याची भावना युवकांमध्ये निर्माण होते, याचा अभिमान वाटतो. वास्तविक आजचे विवाह सोहळे व त्यातील उधळपट्टी पाहिल्यानंतर घृणा वाटते. पैशाच्या अशा उधळपट्टीसारखी दुसरी वाईट गोष्ट नाही. लग्नसोहळा हा कौटुंबिक सोहळा असून त्याला बाजारी स्वरूप येता कामा नये. श्रीमंत वर्गातील व्यक्तींनी सामुदायिक विवाह सोहळ्याकडे पाहण्याची मानसिकता बदलावी, असे ते म्हणाले. केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार यांच्यावर लवकरच लिहिणार आहे, त्यादृष्टीने त्यांच्याशी चर्चा झाली आहे. त्यात बऱ्याच गोष्टी असतील, खुलासे असतील. ते चार पानांचे काम नसल्याने त्याला थोडा वेळ लागेल, असे गडाख यांनी स्पष्ट केले. कार्यक्रमाचे प्रास्तविक पुरुषोत्तम सदाफुले यांनी केले. उद्धव कानडे यांनी सूत्रसंचालन केले.
संग्रहित लेख, दिनांक 13th Mar 2014 रोजी प्रकाशित
विवाह सोहळ्यातील उधळपट्टी पाहून चीड येते – यशवंतराव गडाख
सध्याचे खर्चिक विवाह सोहळे पाहिल्यानंतर चीड येते. संपत्तीचे ओंगळवाणे प्रदर्शन पाहिले की त्याची घृणा वाटते, असे प्रतिपादन माजी खासदार व साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी चिंचवडला केले.

First published on: 13-03-2014 at 02:44 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Come irritate in marriage squander yashwantrao gadakh