प्रथमेश गोडबोले

पुणे : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) प्रस्तावित वर्तुळाकार रस्त्यासाठी पश्चिम मार्गावरील शिल्लक भूसंपादन सक्तीने करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता या प्रकल्पाच्या पूर्व मार्गावरील गावांना भूसंपादन नोटीस पाठविण्यास सुरुवात करण्यात आली आहे. पूर्व मार्गावरील भूसंपादनाची सुरुवात खेड तालुक्यापासून करण्यात येणार आहे. मात्र, खेडमधून ज्या गावांतून हा रस्ता जाणार आहे, तेथे प्रभाव क्षेत्रामुळे मोबदला कमी मिळण्याचा दावा करून स्थानिक लोकप्रतिनिधींनी या ठिकाणचे फेरमूल्यांकन करावे आणि भूसंपादन नोटीसला उत्तर देण्यास मुदतवाढ देण्याची मागणी जिल्हा प्रशासनाला केली आहे.

पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरातील वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने एमएसआरडीसी अंतर्गत १७२ किलोमीटर लांबी आणि ११० मीटर रुंदीचा रिंगरोड प्रकल्प हाती घेण्यात आला आहे. त्यासाठी पश्चिम मार्गावरील ४५० हेक्टरपेक्षा जास्त जमिनीचे स्वेच्छेने संपादन करण्यात आले असून उर्वरित १५ गावांतील भूसंपादन सक्तीने करण्यास सुरुवात झाली आहे, तर दुसऱ्या टप्प्यातील पूर्वेकडील खेड तालुक्याचा समावेश असून येथील १२ गावांत सुमारे ६१४ गटांमध्ये तब्बल २९२ हेक्टर जमीन संपादित करण्यात येणार आहे. यामध्ये खालुंब्रे, निघोजे, कुरुळी, चिंबळी, मोई, निघोजे, केळगाव, चऱ्होली खुर्द, आळंदी, धानोरे, मरकळ, सोळू, गोलेगाव ही गावे बाधित होणार आहेत. ही गावे पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या (पीएमआरडीए) प्रभाव क्षेत्रात असून पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग, चाकण औद्योगिक वसाहतीचे विस्तारीकरण, चाकण तळेगाव, चाकण ते शिक्रापूर मार्ग आणि पीएमआरडीएचा वर्तुळाकार रस्ता देखील येथून प्रस्तावित आहे. प्रभाव क्षेत्र असल्याने येथील जमिनींचे दर कमी ठरविण्यात आले आहेत. त्यामुळे पुन्हा दर निश्चिती करावी आणि भूसंपादन नोटीसला उत्तर देण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी स्थानिक शेतकऱ्यांनी केली.

आणखी वाचा-पुण्याचा पाणीप्रश्न दिल्ली दरबारी

दरम्यान, स्थानिक शेतकऱ्यांच्या शिष्टमंडळासह स्थानिक आमदार दिलीप मोहिते यांनी जिल्हाधिकारी आणि भूसंपादन अधिकाऱ्यांची भेट घेतली. त्यामध्ये या मागण्या करण्यात आल्या. त्यावर लवकरच वर्तुळाकार रस्ता प्रकल्पासाठी स्थापन करण्यात आलेल्या संयुक्तिक समितीसोबत बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल, तसेच बाधितांना पाठविण्यात आलेल्या नोटीसला मुदतवाढ देण्याबाबतही चर्चा करण्यात येईल, असे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी सांगितले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

वर्तुळाकार रस्त्यासाठी भूसंपादन वेगात सुरू आहे. त्यानुसार खेड तालुक्यामध्ये येणाऱ्या १२ गावांतील शेतकऱ्यांना नोटीस देण्यात येत आहे. शासनाने दिलेल्या मुदतीत शेतकऱ्यांनी संपादनासाठी संमतिपत्र दिले, तर शेतकऱ्यांना अधिकचा २५ टक्के मोबदला देण्यात येईल. अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीच्या दरात तफावत येत आहे. याबाबत जिल्हाधिकाऱ्यांकडे पुरावे देण्यात आले आहेत. तोपर्यंत नोटीसला मुदतवाढ द्यावी, अशी मागणी करण्यात आली असून याबाबत समितीपुढे मागणी मांडून निर्णय घेण्यात येईल, असे जिल्हाधिकारी यांनी सांगितले आहे. -दिलीप मोहिते, आमदार, खेड