विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) ‘कम्युनिटी एंगेजमेंट अँड सोशल रिस्पॉन्सिबिलिटी’ हा दोन श्रेयांकाचा अभ्यासक्रम लागू केला आहे. या अभ्यासक्रमाच्या अंमलबजावणीबाबतच्या मार्गदर्शक सूचना यूजीसीने प्रसिद्ध केल्या असून, अभ्यासक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

यूजीसीचे सचिव प्रा. रजनीश जैन यांनी या अभ्यासक्रमाबाबतचे परिपत्रक आणि मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या. पदवीपूर्व आणि पदव्युत्तर पदवीच्या विद्यार्थ्यांना ग्रामीण भागातील वास्तवाची सर्वसमावेश जाणीव होऊन ते प्रेरित होण्याच्या उद्देशाने कम्युनिटी एंगेजमेंट अँड सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अभ्यासक्रमाची निर्मिती करण्यात आली आहे. दोन श्रेयांकांच्या या अभ्यासक्रमात एक श्रेयांक वर्गातील शिक्षक आणि एक श्रेयांक प्रत्यक्ष काम करण्यासाठी आहे. तीस तासांपैकी किमान पन्नास टक्के वेळ विद्यार्थी प्रत्यक्ष काम करण्यासाठी देतील. तर स्वयम संकेतस्थळावर कम्युनिटी एंगेजमेंट अँड सोशल रिस्पॉन्सिबिलिटी हा अभ्यासक्रम फेब्रुवारीमध्ये उपलब्ध होईल.

हेही वाचा >>> मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर ट्रकवर मोटार आदळून तरुणाचा मृत्यू; तिघे जखमी

उन्नत भारत अभियानाअंतर्गत असलेल्या कम्युनिटी एंगेजमेंट अँड सोशल रिस्पॉन्सिबिलिटी या अभ्यासक्रमाच्या मार्गदर्शक सूचनांबाबत यूजीसीने हरकती सूचना मागवल्या होत्या. त्यानुसार आलेल्या आलेल्या हरकती सूचना विचारात घेऊन अंतिम मार्गदर्शक सूचनाही प्रसिद्ध करण्यात आल्या. त्यानुसार दोन श्रेयांकांचा अभ्यासक्रम पूर्ण केल्यावर पदव्युत्तर पदवीचे विद्यार्थ्यांचा अधिकच्या दोन श्रेयांकांसाठी क्षेत्र अभ्यास करता येईल. तसेच सध्याचे काही अभ्यासक्रमांचे अल्पमुदतीच्या अभ्यासक्रमांमध्येही रुपांतर करता येईल. तसेच शाश्वत विकासाच्या उद्दिष्टांबाबत नवा अभ्यासक्रम विकसित करता येईल. त्याद्वारे विद्यार्थ्यांना स्थानिक परिस्थितीची माहिती मिळण्यासह शाश्वत विकासाचे धोरणही समजून घेता येईल, असे यूजीसीने स्पष्ट केले. 

समाजाच्या सहाय्याने संशोधन

अभ्यासक्रमाअंतर्गत समाजाच्या सहाय्याने संशोधन करता येईल. त्यासाठी स्वयंसेवी संस्था, स्थानिक प्रशासनाची मदत घेता येईल. त्याशिवाय विद्यार्थ्यांना कार्यप्रशिक्षण (इंटर्नशीप) हा प्रबावी पर्याय ठरू शकतो, असेही यूजीसीने नमूद केले आहे.