स्वारगेटच्या एसटी स्थानकातून बस पळवून नेत ती शहराच्या रस्त्यांवरून बेदरकारपणे चालवित नऊ जणांचे प्राण घेणाऱ्या व पंचवीसहून अधिक नागरिकांना जखमी करणाऱ्या एसटी चालक संतोष माने प्रकरणात आणखी एका कुटुंबाला नुकसान भरपाई देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. दंतवैद्य महाविद्यालयात शिकणारी १९ वर्षीय तरुणी या घटनेत मृत झाली होती. तिच्या आई-वडिलांसाठी तर आकाशच फाटले होते. ती आता परत येणार नसली, तरी नुकसान भरपाईमुळे आई- वडिलांना न्याय मिळून काहीसा दिलासा मिळाला आहे. सत्र न्यायाधीश आणि मोटार अपघात न्यायप्राधिकरणाचे सदस्य ए. जी. बिलोलीकर यांनी याबाबतचे आदेश दिले.
पूजा भाऊराव पाटील (वय १९) असे या घटनेत मृत्यू झालेल्या तरुणीचे नाव आहे. पूजाची आई जयमाला (वय ४३), वडील भाऊराव जनार्दन पाटील (वय ५०, रा. ससाणेनगर, हडपसर) यांनी नुकसान भरपाईबाबत राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या विरोधात १५ मार्च २०१२ मध्ये दावा दाखल केला होता. त्यानंतर साडेतीन वर्षांनी या प्रकरणाचा निकाल लागला. २५ जानेवारी २०१२ मध्ये ही घटना घडली होती. सकाळी आठच्या सुमारास पूजा मैत्रिणीच्या स्कूटीवर मागे बसून भारती विद्यापीठाकडे चालली होती. त्या वेळी माने चालवित असलेल्या एसटी बसची स्कूटीला मागून धडक बसली. गंभीर जखमी अवस्थेत पूजाला रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, उपचारापूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
पूजा दंतवैद्य महाविद्यालयात दुसऱ्या वर्षांला शिकत होती. अत्यंत हुशार असलेल्या पूजाच्या मृत्यूमुळे आई- वडिलांचे कधीच न भरून निघणारे नुकसान झाले होते. घटनेनंतर दोन महिन्यांनी पूजाच्या पालकांनी नुकसान भरपाईचा दावा दाखल केला. प्रत्येक दाव्याप्रमाणे याही दाव्याला महामंडळाच्या वकिलांनी विरोध केला. घटनेच्या वेळी संतोष माने डय़ुटीवर नव्हता. त्याला संबंधित बस चालविण्याचा आदेश देण्यात आला नव्हता. त्यामुळे महामंडळ नुकसान भरपाई देण्यास जबाबदार नाही, असा युक्तिवाद महामंडळाच्या वकिलांनी केला. मात्र, न्यायालयाने पूजाचे वय, भविष्यात तिच्याकडून होणाऱ्या कमाईचा विचार करून आई-वडिलांना २४ लाख ७५ हजार रुपये नुकसान भरपाई देण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे दावा दाखल झाल्याच्या तारखेपासून या रकमेवर नऊ टक्के व्याज देण्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.