पुणे : महापालिकेच्या आगामी निवडणुकांसाठी प्रभागरचना करताना नैसर्गिक हद्दींकडे दुर्लक्ष करत चुकीच्या पद्धतीने प्रभाग तोडण्यात आल्याच्या तक्रारींची शाहनिशा केली जाईल.’ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
पुणे महापालिकेच्या हद्दीत नव्याने समाविष्ट झालेल्या ३२ गावांच्या सर्वांगीण विकासाबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी सर्किट हाऊस येथे बैठक झाली. पुणे महापालिकेचे आयुक्त नवल किशोर राम यांनी ३२ गावांतील सुविधांबाबत सादरीकरण केले. बैठकीमध्ये महापालिकेत समाविष्ट करण्यात आलेल्या ३२ गावांबाबत अनेक प्रश्न माजी नगरसेवकांनी मांडले. तसेच पुणे महापालिकेची प्रारुप प्रभाग रचना करताना नैसर्गिक सीमा असलेल्या नदी, ओढे, रस्ते यांच्याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याच्या तक्रारी करण्यात आल्या.
प्रभागरचना करताना प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची ताकद असलेले प्रभाग तोडल्याच्या तक्रारी माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱ्यांनी केल्या. त्यावर याबाबत लेखी निवेदन द्यावे, त्याची शहानिशा करण्यात येईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री पवार यांनी दिले.
‘प्रभागरचेबाबत घेण्यात आलेले आक्षेप हा महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे. या तक्रारींची शहानिशा करण्यात येईल,’ असे पवार यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पवार म्हणाले, ‘पुण्यामध्ये नगरसेवकांचे वेगवेगळे मतप्रवाह आहेत. चर्चा करून प्रश्न मार्गी लावले जातील. पिंपरी-चिंचवडमध्ये जास्त काही बदल केलेले नाही. प्रभाग रचना हा महायुतीचा अंतर्गत प्रश्न आहे. वरिष्ठ पातळीवर निर्णय होईल.’
‘समाविष्ट गावातील नागरिकांना सोयीसुविधा पुरविण्यासाठी आवश्यक असलेला निधी, गावातील पाणीपुरवठा, नदीवरील पूल, रस्ते, सांडपाणी व्यवस्थापन, घनकचरा व्यवस्थापन या विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. महापालिका आयुक्तांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या आहेत.’ असे पवार यांनी स्पष्ट केले.
‘स्वबळाचा नारा नाही’
महापालिकेच्या निवडणुकीत स्वबळाचा नारा दिलेला नाही. निवडणुकीचे अंतिम चित्र स्पष्ट झाल्यानंतर महायुतीकडून राज्यात कोणकोणत्या शहरात कशा पद्धतीने निवडणुकीला सामोरे जायचे, याचा निर्णय घेतला जाईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले.