पुणे : महापालिका सभागृहाची मुदत संपल्याने कारभार महापालिका प्रशासकांच्या हाती गेला असला तरी गेल्या दीड महिन्यांपासून कामे होत नसल्याची तक्रार भारतीय जनता पक्षाच्या शिष्टमंडळाने केली आहे. शहराच्या बहुतांश भागाला होत असलेला अपुरा पाणीपुरवठा आणि खोदलेल्या रस्त्यांसह अन्य प्रलंबित विषयांवरून भाजप शिष्टमंडळाने तक्रारींचा पाढाच आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांच्यापुढे मांडला.
शहरातील प्रलंबित प्रश्न आणि अन्य समस्यांबाबत भारतीय जनता पक्षाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळाने महापालिका आयुक्त, प्रशासक विक्रम कुमार यांची सोमवारी भेट घेतली. संघटन सरचिटणी राजेश पांडे, माजी सभागृहनेता गणेश बीडकर, माजी आमदार योगेश टिळेकर, सरचिटणीस गणेश घोष, राजेश येनपुरे, दीपक नागपुरे, युवा मोर्चा प्रदेश सरचिटणीस सुशील मेंगडे यांच्यासह अन्य पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. कामे तातडीने मार्गी लावण्यासाठी आणि प्रलंबित प्रश्न सोडविण्यासाठी महापालिका आयुक्तांनी अधिकाऱ्यांवर जबाबदारी आणि त्याचे उत्तरदायित्व निश्चित करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली. दरम्यान, तक्रारी आणि प्रलंबित प्रश्नांबाबत तातडीने ठोस उपायोयजना केल्या जातील, असे आश्वासन विक्रम कुमार यांनी दिले.
संपूर्ण शहरातील प्रमुख रस्ते, उपरस्त्यांची मोठय़ा प्रमाणावर दुरवस्था झाली आहे. अनेक ठिकाणी रस्ते खोदण्यात आले आहेत. पावसाळापूर्व कामे, नालेसफाई, सांडपाणी वाहिन्या, पावसाळी गटारांची कामे संथ गतीने सुरू आहेत. त्यामुळे पावसाळय़ापूर्वी ही कामे पूर्ण न झाल्यास पावसाचे पाणी तुंबून दुर्घटना होण्याची शक्यता आहे. त्यामुळे रस्ते दुरुस्तीसह पावसाळापूर्व कामे वेगाने करावीत, याकडे आयुक्तांचे लक्ष वेधण्यात आले. अतिवृष्टीमुळे पूर परिस्थिती निर्माण झाल्यास त्यातून मार्ग काढण्यासाठी आपत्कालीन आणि अत्याधुनिक यंत्रणा उभी करावी तसेच धोकादायक इमारती, वाडय़ांना संभाव्य धोक्याची सूचना द्यावी, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.
शहरातील अनेक भागांना अत्यंत कमी दाबाने पाणीपुरवठा होत आहे. पाणीपुरवठय़ाबाबत नागरिकांच्या असंख्य तक्रारी आहेत. महापालिका अधिकाऱ्यांकडे तक्रार केल्यानंतर अधिकारी वर्गाकडून त्याची दखल घेतली जात नाही. महापालिका हद्दीत समाविष्ट झालेल्या गावांमध्येही अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे पुरेशा दाबाने आणि सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा. अपुऱ्या पाणीपुरवठय़ाबाबतची कारणे शोधावीत आणि ठोस उपाययोजना कराव्यात, असे भाजप शिष्टमंडळातील पदाधिकाऱ्यांनी सांगितले. नद्यांमध्ये मोठय़ा प्रमाणावर जलपर्णी साचल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातून साथ रोगांचा संसर्ग वाढण्याची भीती आहे. त्यामुळे जलपर्णी तातडीने काढावी आणि डास निर्मूलन अभियान तातडीने हाती घ्यावे तसेच महापालिका अंदाजपत्रकासंदर्भात नागरिकांच्या सूचना घेऊन त्यासाठी आर्थिक तरतूद करावी आणि कामांना गती द्यावी, असे शिष्टमंडळाकडून स्पष्ट करण्यात आले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Complaints nonperformance administrators various demands commissioner bjp delegation municipal administrators amy
First published on: 03-05-2022 at 01:12 IST