वार्धक्याचा टप्पा प्रत्येक कुटुंबाला पाहावाच लागतो. त्याला सामोरे जाताना भावनिक, व्यावहारिक, सांस्कृतिक अशा अनेक पातळ्यांवरच्या टीका टिप्पण्यांना तोंड देत वृद्धाश्रमाची संकल्पना उभी राहिली. त्याला सोय म्हणावे, गरज म्हणावे की, जबाबदारी झटकण्याची निष्पत्ती यावर वाद नक्कीच होऊ शकतो, त्यावर या परिस्थितीला तोंड देणाऱ्या प्रत्येकाकडे त्याचे आपल्या पुरते समर्थनही असू शकते. मात्र या पलीकडे जाऊन वृद्धाश्रम उभे राहिले आणि ते स्वीकारलेही गेले. त्याचप्रमाणे आता प्राणी वृद्धाश्रमांना जवळ करण्याचा टप्पा कुटुंबव्यवस्थेत स्वीकारला गेला आहे. अमेरिकेमध्ये या दशकातच रुजलेली प्राणी वृद्धाश्रमाची संकल्पना आता भारतातही रुळली आहे.
प्राणी वृद्धाश्रमाची संकल्पना
कौतुकाने पाळले जाणारे प्राणी त्यांच्या पालकांसाठी जीव की प्राण असतात, मात्र त्यांचा जीवनकाल हा मर्यादित असल्यामुळे मानवी वृद्धत्वात ज्या समस्या येतात, त्याहून कैकपटीने अधिक प्राण्यांना त्यांच्या अखेरच्या घटका जवळ आल्यावर त्या येतात. घरी आलेले कुत्रे किंवा मांजराचे पिल्लू बघता बघता मोठे होते. कालपर्यंत अवखळपणे बागडणाऱ्या त्याच्या आपल्या मनातील आठवणी ताज्या असेपर्यंतच प्राण्याच्या वृद्धत्वाची चाहूल लागलेली असते. घरातील वृद्ध व्यक्तीची मायेने काळजी घेण्याची गरज प्राण्यांबाबतही लागू असते. वयानुसार माणसाप्रमाणेच प्राण्याच्याही गरजा बदललेल्या असतात. प्राणी पाळणे ही १५ ते २० वर्षांची जबाबदारी असते. प्राणी घेताना ते बहुतेक वेळा त्याच्या दिसण्यावर घेतलेले असतात. वृद्धत्वाने प्राण्यांच्याही दिसण्यात फरक पडतो आणि काही वेळा प्राणी आणि त्याच्या पालकाच्या नात्याचे समीकरण बदलते. वयोपरत्वे रोगप्रतिकारशक्ती गमावल्यामुळे त्यांना काही प्रकारचे संसर्गजन्य आजारही होतात. पाळलेल्या प्राण्यांना घराबाहेर काढणे हे अमानुष असले, तरीही अशा मानसिकतेचे प्रमाण कमी नाही हे वास्तव आहे. प्राणी वृद्ध झाला की त्याला घरात ठेवण्याने अवघड झाल्याने नाईलाजाने काहीजण बेवारस स्थितीत रस्त्यावर सोडून देतात. आयुष्यभर मानवी सानिध्यात राहिलेले हे प्राणी अखेरच्या काळात रस्त्यावरील जीवनाशी एकरूप होऊ शकत नाहीत. माणसांसोबत राहिलेल्या प्राण्या-पक्ष्यांना स्वतंत्रपणे बाहेर राहणे अवघड जाते. पिल्लू म्हणून घरात आणलेले पेट जेव्हा म्हातारे होते तेव्हा मानसिक आणि शारीरिक त्राण गमावून बसते. त्याची अधिक काळजी घेण्याची, त्याला वेळ देण्याची गरज असते. कधी हौसेच्या पलीकडे प्राणीपालनामागे असलेल्या जबाबदारीची जाणीव नसते म्हणून तर कधी वेळ आणि व्यवहाराचे गणित जमत नाही म्हणून नाईलाजाने प्राण्यांच्या निवाऱ्यासाठी एखादा दुसरा पर्याय शोधण्याची वेळ पालकांवर येते. या कठीण निर्णयात सध्या प्राणी वृद्धाश्रम पालकांना मदत करत आहेत. वृद्धापकाळामुळे त्राण हरवून बसलेल्या प्राण्या-पक्ष्यांची येथे शुश्रूषा केली जाते.
गरज का?
सजग प्राणी पालकांची गरज ओळखून भारतामध्येही अमेरिकेच्या धर्तीवर गेल्या पाचेक वर्षांत प्राणी वृद्धाश्रम तयार होत आहेत. नाममात्र शुल्कामध्ये प्राण्यांचे अखेरचे आयुष्य सुखाने जगू देण्याची हमी ही पेट वृद्घाश्रमे देतात. महाराष्ट्रात कर्जत येथील प्राणी वृद्धाश्रम प्राणी पालकांमध्ये प्रसिद्ध आहे. पुण्यातही सध्या प्राण्यांसाठीचे पाच ते सहा वृद्धाश्रम कार्यरत आहेत. येत्या काळात काही नवे सुरू होत आहेत. घरात पाळलेले प्राणी, थेरपीसाठी किंवा सुरक्षेसाठी बाळगलेले आणि निवृत्त झालेल्या प्राण्यांची काळजी या ठिकाणी घेतली जाते. या काळातील त्यांच्या आरोग्याची काळजी, त्यानुसार खाण्यापिण्याची काळजी घेतली जाते. वेळ असेल तेव्हा पालक या ठिकाणी जाऊन आपल्या पेटला भेटू शकतात, त्याच्याशी खेळू शकतात. पुण्यातील काही पेट रिसॉर्टकडून हे वृद्धाश्रम चालवले जातात. गेल्या काही वर्षांमध्ये यासाठी प्रतिसाद वाढला असल्याचे रोशन पद्दुवाल यांनी सांगितले. ‘वृद्ध प्राण्यांना गरजेइतका वेळ देणे पालकांना शक्य नसते. त्याचबरोबर काही वेळा प्राण्यांचे वार्धक्य पाहण्याची मानसिकता नसते, परदेशी किंवा दुसऱ्या गावी स्थायिक व्हायचे असते. अशावेळी प्राणी वृद्धश्रमात येतात,’ अशी माहिती रोशन यांनी दिली.
ऑनलाईन सहकारी
घरी पाळलेला प्राणी अवघ्या १५-२० वर्षांत वृद्ध होतो हे पालकांनी स्वीकारणे हे महत्त्वाचे असते. आपल्यासाठी आपले पेट हे लहानच वाटत असते. ते नेहमीच उत्साही, खेळकर असावे. त्याने मस्ती करावी अशी अपेक्षा पालकांची असते. प्रत्यक्षात प्राण्याची गरज मात्र वेगळी असते. प्राण्याच्या वयानुसार त्याचे खाणे, आरोग्य, सवयी याबाबत मार्गदर्शन करणारी अनेक संकेतस्थळे सध्या कार्यरत आहेत. प्राणी पालक ही संकेतस्थळे, चॅटिंग ग्रुप्स, अॅप्स यांच्या माध्यमातून एकमेकांना जोडले गेले आहेत.
