पुणे : सध्या रस्त्यावरील खड्ड्यांमुळे पुणेकर हैराण झाले आहेत, ही वस्तुस्थिती आहे. त्यावर तात्पुरती उपाययोजना करण्याचे आदेश महापालिका प्रशासनाला दिले आहेत. मात्र पुण्यातील १४०० किलोमीटर रस्त्यांपैकी केवळ दोनशे किलोमीटर रस्ते सिमेंट कॉंक्रिटचे आहेत. उर्वरित १२०० किलोमीटरचे रस्ते सिमेंट काँक्रिटचे होणे आवश्यक आहे. सर्व रस्ते सिमेंट कॉंक्रिटचे झाल्याशिवाय खड्ड्यांचा प्रश्न कायमस्वरूपी सुटणार नाही, असे मत उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी शनिवारी मांडले. तसेच सिमेंट काँक्रिट रस्त्यांसाठी प्रस्ताव तयार करण्याच्या सूचना महापालिका प्रशासनाला दिल्याची माहितीही त्यांनी दिली.

शहरातील विविध प्रकल्प, समस्यांबाबत पाटील यांनी शनिवारी पुणे महापालिकेला भेट देत आयुक्त तथा प्रशासक विक्रमकुमार यांच्याशी चर्चा केली. खासदार गिरीश बापट, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, भाजपचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक, माजी महापौर मुरलीधर मोहोळ, भाजपचे संघटन सरचिटणीस राजेश पांडे, स्थायी समितीचे माजी अध्यक्ष हेमंत रासने, माजी सभागृहनेते गणेश बीडकर, शहर प्रवक्ते संदीप खर्डेकर आदींसह पालिकेचे अधिकारी उपस्थित होते.

पाटील म्हणाले, की एका किलोमीटरच्या सिमेंटच्या रस्त्यासाठी पाच कोटी या प्रमाणे पुण्यातील सर्व रस्त्यांसाठी सहा हजार कोटी रुपये लागतील. त्यामध्ये राज्य सरकार आणि महापालिका यांची पन्नास टक्के भागीदारी शक्य आहे का, हे पडताळून पाहिले जाईल. प्रकल्प, समान पाणीपुरवठा योजना यासह अन्य योजनांची कामे सुरू असल्याने, यंदा पाऊस खूप झाल्याने ११०० किलोमीटरच्या रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. तात्पुरती योजना म्हणून हे खड्डे लवकरात लवकर बुजवावेत. त्यासाठी अल्पमुदतीच्या निविदा काढाव्यात. पीएमआरडीए किंवा अन्य कंपन्यांमुळे खड्डे पडले असल्यास ते पालिकेनेच बुजवून डेबिट नोटद्वारे त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याच्या सूचना केल्या आहेत. वर्दळीच्या, महत्त्वाच्या ठिकाणचे मोटे खड्डे तातडीने बुजवल्यास वाहतूक कोंडी सुटण्यास मदत होईल.

केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यासह २ सप्टेंबरला चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाचा आढावा २ सप्टेंबरला घेणार आहे. समान पाणीपुरवठा योजनेचे बारा विभागांमधील काम पूर्ण झाले आहे. त्याच्या उद्घाटनासाठी येत्या दोन ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यात येतील. या वेळी जायका प्रकल्पातील दोन सांडपाणी प्रक्रिया केंद्रांचे भूमीपूजनही करण्यात येणार असल्याची माहितीही पाटील यांनी दिली.

मिळकत कर सवलतीसंदर्भात १२ सप्टेंबरला बैठक

पुणेकरांच्या मिळकतकरातील ४० टक्के सवलत रद्द झाल्याने त्यापोटीच्या थकबाकीसाठी काढण्यात आलेल्या देयकांना सध्या स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे सध्या कोणीही ही थकबाकी भरू नये. या संदर्भात १२ सप्टेंबर रोजी मंत्रालयात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री तसेच नगरविकास विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेण्यात येईल. राज्यातील काही शहरांमध्ये प्रॉपर्टी कार्ड आणि सातबाराही आहे. त्यामुळे एका व्यक्तीला महापालिकेचा कर आणि तलाठ्याचा शेतसारा हे दोन्ही कर भरावे लागतात. महाराष्ट्रातील दुहेरी कराचा प्रश्न अजून संपलेला नाही, याकडेही पाटील यांनी लक्ष वेधले.