केंद्राती मोदी सरकारच्या नऊ वर्षानिमित्त काँग्रेसकडून नऊ प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या प्रश्नांची उत्तरे द्यावीत, अशी मागणी काँग्रेसच्या प्रवक्त्या अनुमा आचार्य यांनी पत्रकार परिषदेत केली. मोदी सरकार दलित आणि आदिवासी यांचे बद्दल खोटे प्रेम दाखवित असून मतांचे राजकारण सरकारकडून सुरू आहे, असा आरोपही त्यांनी केला.
हेही वाचा >>> अजित पवार यांनी काँग्रेसला पुन्हा डिवचले… म्हणाले, पुण्यात राष्ट्रवादीची ताकद काँग्रेसपेक्षा जास्त




अनुमा आचार्य यांच्या हस्ते ‘नऊ वर्षे नऊ प्रश्न’ या पुस्तिकेचे प्रकाशनही पत्रकार परिषदेत करण्यात आले. माजी आमदार उल्हास पवार,महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस अभय छाजेड, माजी महापौर कमल व्यवहारे, महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस उपाध्यक्ष संगिता तिवारी, नीता रजपूत, माजी नगरसेविका सुजाता शेट्टी, माजी नगरसेवक रफिक शेख यांच्यासह अन्य पदाधिकारी या वेळी उपस्थि होते. आचार्य म्हणाल्या की, नव्या संसद भवनाच्या उद्घाटनावेळी राष्ट्रपती द्रोपदी मुर्मू यांना निमंत्रण नाकारून मोदी सरकारने मनुवादी वृत्ती दाखवली आहे. मोदी सरकार जातीयवादी असल्याचे लोकांच्या लक्षात येत आहे. सरकारच्या वागण्यात आणि बोलण्यात मोठी तफावत आहे. गेल्या नऊ वर्षात मोदी सरकारला विविध पातळ्यांवर अपयश आले आहे. अर्थव्यवस्था, परराष्ट्र संबंध, कृषी, समाजिक सद्भावना आणि सामाजिक न्याय आदी वेगवेगळ्या मुद्द्यांवर सरकारला अपयश आले आहे. त्यामुळेच काँग्रेसने नऊ प्रश्न उपस्थित केले आहेत. त्याची उत्तरे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी द्यावीत.