पुणे : ‘महाराष्ट्र मेट्रो रेल्वे काॅर्पोरेशन (महामेट्रो) प्रकल्पासाठी सहा वर्षांपूर्वी पाडण्यात आलेले महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे (एसटी) शिवाजीनगर बस स्थानक अद्यापही मूळ जागी उभे राहिलेले नाही. प्रवाशांसाठी असलेल्या या महत्त्वाच्या सुविधेला इतका विलंब का,’ असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष मोहन जोशी यांनी उपस्थित केला आणि भाजपवर टीका केली. ‘हा वेळकाढूपणा नाही, तर प्रवाशांच्या सुविधांचा खेळखंडोबा आहे,’ अशा शब्दांत त्यांनी मंगळवारी भाजपवर घणाघात केला.
जोशी म्हणाले, ‘महामेट्रो आणि एसटी महामंडळ या दोघांमध्ये शिवाजीनगर बस स्थानकासंदर्भात करार करण्यात आला होता. सात वर्षात स्थानकाची जागा बांधून पुन्हा एसटी महामंडळाला देण्यात येईल. मात्र, सहा वर्षांचा काळ उलटला आहे, तरी कुठलीच हालचाल नाही. नवीन माहितीनुसार आता भाजप आणि सत्ताधारी पक्षांनी ६० ऐवजी ९८ वर्षांच्या करार करून सार्वजनिक, खासगी आणि भागीदारी तत्त्वानुसार (पीपीपी) व्यावसायिक संकुल ठेकेदारांच्या घशात घालून कोट्यावधी रुपयांचा डल्ला मारण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. लवकरच या प्रस्तावाला मंजुरी मिळण्याची शक्यता असली, तरी ही सामान्य पुणेकरांची चेष्टा आहे.’
‘सर्वसामान्य पुणेकरांना वाकडेवाडी येथील स्थानकावर जाण्यासाठी आर्थिक भुर्दंड सहन करावा लागत आहे. वाकडेवाडी बस स्थानकावर पायाभूत सुविधांचा अभाव आहे. पुणेकरांच्या संयमाचा फायदा सत्ताधाऱ्यांनी घेऊन खासगी हितसंबंध जोपासून जागा विकासकाच्या ताब्यात देण्याचा घाट घातला आहे. शिवाजीनगर बस स्थानक पुणेकरांसाठी अत्यंत महत्त्वाचा भाग असून, काँग्रेस पक्ष सातत्याने निवेदने, आंदोलने आणि अधिकाऱ्यांच्या भेटीगाठी अशा मार्गांनी पाठपुरावा करत आहे. पुणेकरांच्या हितासाठीच्या लढ्यात काँग्रेस मागे हटणार नाही,’ असा निर्धारही जोशी यांनी व्यक्त केला.
‘पुणेकरांना ताजमहाल नको, फक्त स्थानक पाहिजे’
पुणे शहरातील भाजपचे मंत्री, आमदार यांना आम्ही ताजमहाल उभा करायला सांगत नाही, तर फक्त साधे एसटी स्थानक उभारायचे आहे, ते ही त्यांच्याकडून जमत नाही, याचा अर्थ पुणेकरांच्या अडचणींबाबत सत्ताधाऱ्यांना काही देणेघेणे नाही. त्यांच्या अजेंड्यात फक्त खोटी आश्वासने देऊन निवडणुका जिंकणे’ हे स्पष्ट होत आहे, अशी टीका जोशी यांनी केली.