आदर्श सोसायटी गैरव्यवहाराबाबत काँग्रेसच्या नेत्यांवर केलेली टीका ही मुलाखतीनंतर अनौपचारिक गप्पांच्या ओघात केली होती. त्या अनौपचारिक गप्पा आणि त्या ओघात केलेली काही विधाने माझी मुलाखत म्हणून छापली गेली, असे सांगतानाच माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी मुलाखतीमधील वादग्रस्त विधानांबाबत गुरुवारी दिलगिरी व्यक्त केली.
पुण्यात सध्या जागतिक ज्युनियर बुद्धिबळ स्पर्धा सुरू असून या स्पर्धेला चव्हाण यांनी भेट दिली. त्यानंतर ते काँग्रेस भवनकडे निघाले होते. दरम्यान पत्रकारांशी बोलताना त्यांनी सध्या वादग्रस्त ठरलेल्या त्यांच्या मुलाखतीबाबत स्पष्टीकरण दिले. आदर्श घोटाळ्याशी संबंधित नेत्यांवरील टिप्पणी ही मुलाखतीनंतर अनौपचारिक गप्पा सुरू असताना मी केली होती. गप्पांच्या ओघात ती टिप्पणी मी केली. मात्र त्यालाच प्रसिद्धी देण्यात आली. त्या टिप्पणीत मी काँग्रेसच्या नेत्यांवर टीका केली होती. मात्र, त्याबाबतही मी दिलगिरी व्यक्त करतो. मी गप्पांमध्ये जी विधाने केली ती अनावधानानेही व्हायला नको होती. ती चूकच होती, असे मला वाटते आहे, असे चव्हाण म्हणाले.
राज्यातील नव्या समीकरणांबाबत निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर बोलणे योग्य ठरेल. अनेक ठिकाणी चुरशीच्या लढती होत्या. त्यामुळे मतदानाची टक्केवारी वाढली आहे असे सांगतानाच वृत्तवाहिन्यांवर जे मतदानोत्तर चाचण्यांचे निकाल दाखवण्यात आले ते बघितलेले नाहीत, असेही चव्हाण यांनी सांगितले.
संग्रहित लेख, दिनांक 17th Oct 2014 रोजी प्रकाशित
‘त्या’ विधानांबाबत चव्हाण यांची दिलगिरी
अनौपचारिक गप्पा आणि त्या ओघात केलेली काही विधाने माझी मुलाखत म्हणून छापली गेली.

First published on: 17-10-2014 at 03:25 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Congress prithviraj chavan chat