पुणे : ‘गावोगावी काँग्रेसचा चिवट कार्यकर्ता आहे. जाज्ज्वल इतिहास आणि विचार, तसेच सक्षम नेतृत्व ही काँग्रेसची जमेची बाजू आहे. मात्र, कृती, संघभावना आणि संघटनेत काँग्रेस कमी पडत आहे. मी-मी केल्याने अनेक त्रिज्या निर्माण झाल्या आहेत. ही उणीव भरून काढावी लागेल,’ असे स्पष्ट मत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी येथे सोमवारी व्यक्त केले. ‘प्रदेश कार्यकारिणीच्या प्रशिक्षण कार्यशाळेच्या माध्यमातून ही कमतरता दूर होईल, असा विश्वास आहे,’ असेही सपकाळ म्हणाले.

काँग्रेसच्या नवनियुक्त प्रदेश पदाधिकाऱ्यांच्या दोन दिवसीय कार्यशाळेला सोमवारी खडकवासला येथे सुरुवात झाली. या कार्यशाळेचे उद्घाटन सपकाळ यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. विधानसभेतील गटनेते विजय वडेट्टीवार, विधान परिषदेतील गटनेते सतेज उर्फ बंटी पाटील, काँग्रेस कार्य समितीचे सदस्य आणि माजी महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, माजी मंत्री डॉ. विश्वजित कदम, अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव बी. एम. संदीप, कुणाल चौधरी, यू. बी. व्यंकटेश, उपाध्यक्ष संघटन आणि प्रशासन ॲड. गणेश पाटील, वरिष्ठ प्रवक्ते अतुल लोंढे, प्रदेश काँग्रेसचे खजिनदार ॲड. अभय छाजेड आणि उपाध्यक्ष मोहन जोशी या वेळी उपस्थित होते.

‘एकसंघ राहणे ही काँग्रेसची कार्यपद्धती आहे. कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचे ते उत्तरदायित्व आहे. सध्या काँग्रेसमध्ये कोण कोणत्या गटाचा आणि कोण कोणत्या नेत्याच्या जवळचा असा प्रकार दिसत नाही. मात्र, येत्या काळात काही दक्षता घ्यावी लागेल. ‘ओरिएंटेशन’, ‘इंट्रोडक्शन’ आणि ‘इंटरॲक्शन’ या त्रिसूत्रीवर काम करावे लागणार आहे. निवडणुकीपुरते जागे व्हायचे आणि निवडणुकीनंतर सर्व संपले, हा काँग्रेसचा विचार नाही, हे लक्षात घ्यावे लागेल,’ असे सपकाळ यांनी सांगितले.

ते म्हणाले,‘ काँग्रेसची भूतकाळातील स्थिती, वर्तमानातील अस्तित्व आणि भविष्यातील परिस्थितीचा विचार आता करावा लागणार आहे. दहा हजार कोटी रुपये खर्च करून काँग्रेस नेते राहुल गांधी यांची प्रतिमा डागाळण्याचा प्रयत्न करण्यात आला. तो हाणून पाडला. राहुल गांधी यांच्या रूपाने पक्षाला सक्षम नेतृत्व मिळाले आहे. त्यामुळे पक्षाचा विचार तळागाळापर्यंत पोहोचवावा लागेल. नवीन कार्यकारिणी पक्षाला काय देणार याचा विचार करावा लागणार आहे.’

‘धार्मिक ध्रुवीकरणामुळे ओबीसी काँग्रेसपासून दूर’

‘भविष्यात काँग्रेसपुढे मोठी आव्हाने आहेत. सत्तेसाठी संघटन नको, तर संघटनेत काम करून सत्ता प्राप्त करावी लागेल,’ असे सांगून विजय वडेट्टीवार म्हणाले, ‘धार्मिक भावनांच्या माध्यमातून राजकारण केले जात आहे. लोकांच्या मनात प्रचंड राग आणि चीड आहे, वेदना आहेत. संघटनेत काम करणाऱ्यांनी त्या समजून घेऊन लोकांपर्यंत पोहोचणे आवश्यक आहे. सध्या काही ठरावीक पदाधिकारी आंदोलनात दिसतात. कामाने आणि कर्तृत्वाने ओळख निर्माण करण्याची जबाबदारी नव्या कार्यकारिणीवर आहे. धार्मिक ध्रुवीकरणामुळे अन्य मागासवर्गीय (ओबीसी) मतदार आपल्यापासून दूर गेले आहेत. त्यांच्यात विश्वास निर्माण करून त्यांना पुन्हा काँग्रेसबरोबर आणण्याची गरज आहे.’

काँग्रेसचे पाच कार्यकर्ते एकत्र आले, तर आपल्या उमेदवाराला कसे पाडायचे याचा विचार करतात. हा विचार आता बदलावा लागेल. – विजय वडेट्टीवार