पुणे : मतदारांची चोरी करून भारतीय जनता पक्ष सत्तेत बसला आहे. या पक्षाकडे छप्पन इंचांची छाती असलेले राष्ट्रीय नेतृत्व आणि सुपरमॅन मुख्यमंत्री असल्याचा दावा त्यांचे नेते करतात. मात्र हा पक्ष चेटकणीचा पक्ष आहे. त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत. ही बाब हास्यास्पद आहे. धाक दाखवून काँग्रेसचे कार्यकर्ते भाजप घेत आहे, अशा शब्दांत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपवर बुधवारी टीका केली.
जाणारा माणूस ठरवून जातो. त्याला थांबविता येत नाही. अन्याय झाला म्हणून कोणी जात नाही, तर स्वत:च्या संस्था वाचविण्यासाठी जातात, अशी प्रतिक्रिया सपकाळ यांनी पुरंदरचे माजी आमदार आणि जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांच्या भाजप प्रवेशासंदर्भात दिली.
सर्व काही दिलेल्या माजी मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस सोडली; मग तिथे जिल्हाध्यक्षांचे काय, असा टोलाही त्यांनी लगाविला. पुरंदरचे माजी आमदार काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष संजय जगताप यांनी बुधवारी सासवड येथे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भाजपमध्ये प्रवेश केला. या पार्श्वभूमीवर काँग्रेस भवनात जिल्हा काँग्रेसची तातडीची बैठक झाली. या बैठकीला उपस्थित राहण्यापूर्वी सपकाळ यांची पत्रकार परिषद झाली. त्या वेळी त्यांनी भाजपवर टीका करतानाच संजय जगताप यांनाही टोला लगावला.
काँग्रेस देशातील सर्वाधिक जुना पक्ष आहे. या पक्षाने देशाला राज्यघटना दिली. मात्र, भाजप मतदारांची चोरी करून सत्तेत बसलेला पक्ष आहे. त्यांच्याकडे कार्यकर्ते नाहीत आणि ते त्यांच्या नेत्यांना मोठेही करत नाही. मात्र, अन्य पक्षातील पदाधिकाऱ्यांना आणि कार्यकर्त्यांना धाक दाखवून ते त्यांना पक्षात घेत आहेत. काँग्रेस हा नेत्यांचा नव्हे, तर विचारांचा पक्ष आहे, असे सपकाळ यांनी सांगितले.
जिल्हाध्यक्षावर ही वेळ का आली अशी विचारणा केली असता, सपकाळ म्हणाले, जाणारे त्यांच्या संस्था वाचविण्यासाठी जात असावेत. ते का जात आहेत हे तेच सांगू शकतील. मात्र अन्याय झाला असे सांगून कोणी जात असेल, तर ते चुकीचे आहे. सर्व काही मिळाले असताना संस्था वाचविण्यासाठी पक्ष सोडणे हा संधिसाधूपणा आहे. काँग्रैसने सर्व काही दिलेल्या मुख्यमंत्र्यांनीही काँग्रेस सोडली होती. त्यामुळे जाणारा माणूस ठरवून जातो, तेव्हा त्याला थांबविता येत नाही.
राज्यातील महिला बेपत्ता होण्याचे प्रमाण सात टक्क्यांनी वाढले आहे. या संदर्भात बोलताना सपकाळ यांनी मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर नाव न घेता टीका केली. राज्यात कायदा आणि सुव्यवस्था राहिलेली नसून घाशीराम कोतवाल कायदा आणि राज्य चालवित आहेत, असे ते म्हणाले. शिवसेनेच्या मंत्र्यांकडे पैशांच्या बॅगा सापडत आहेत. त्यावर एकनाथ शिंदे आणि त्यांचे आमदार म्हणजे अलीबाबा आणि चाळीस चोर आहेत, अशी टीका त्यांनी केली. काही मंत्र्यांना हनी ट्रँपमध्ये अडकविण्याच्या प्रकाराची एसआयटी चौकशी झाली पाहिजे. सरकारने हे प्रकरण दडपू नये, अशी मागणीही त्यांनी केली.
संभाजी ब्रिगेडचे माजी प्रदेशाध्यक्ष प्रवीण गायकवाड यांच्यावर अक्कलकोट येथे हल्ला झाला होता. त्या पार्श्वभूमीवर हर्षवर्धन सपकाळ यांनी गायकवाड यांची भेट घेतली. त्या संदर्भातही सपकाळ यांनी प्रतिक्रिया दिली. राज्यात आणि देशात वैचारिक काम करणाऱ्यांची गळचेपी केली जात आहे. विवेकवादाची मांडणी करणारे नरेंद्र दाभोलकर यांचा खून करण्यात आला. वैचारिक मांडणी करणारे गोविंद पानसरे यांच्याबाबतही हाच प्रकार घडला. तोच प्रवीण गायकवाड यांच्या बाबतीतही घडला आहे. वैचारिक मांडणी करणाऱ्यांना धमकाविणे, त्यांना घाबरविणे हाच प्रकार सध्या सुरू आहे. गायकवाड यांच्यावरील हल्ल्यामागे महसूलमंत्री असल्याने राज्यात काय सुरू आहे हे स्पष्ट होत आहे. मात्र, भाजपचे हे कारस्थान लोकांपर्यंत पोहोचवून वैचारिक क्रांती केली जाईल आणि त्या प्रक्रियेला सुरूवात झाल्याचे सपकाळ यांनी सांगितले.