रेश्मा भोसले यांना निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाचे ‘कमळ’ हे चिन्ह मिळणार असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर त्याचे तीव्र पडसाद राजकीय पटलावर उमटले. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी आमदार भोसले यांना लक्ष्य करीत त्यांच्यावर कडाडून टीका केली. तर काँग्रेसने या प्रकाराला भाजपला जबाबदार धरले. निवडणूक प्रक्रियेत भाजप हस्तक्षेप करीत असल्याचा आरोप करीत यासंदर्भात न्यायालयात जाणार असल्याचा इशारा काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी दिला.
महापालिका निवडणुकीसाठी पुणे विद्यापीठ-वाकडेवाडी या प्रभागातून रेश्मा भोसले यांनी भाजपचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. मात्र ऑनलाईन पद्धतीने दाखल केलेल्या अर्जात पक्षाचे नाव राष्ट्रवादी तर भाजपचा एबी फॉर्म अशा विसंगतीमुळे त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून जाहीर करण्यात आले. मात्र सोमवारी भोसले या भाजपच्या अधिकृत उमेदवार असल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले. त्यावरून निवडणूक प्रक्रियेत भाजप हस्तक्षेप करीत असून हुकूमशाही पद्धतीने वागत असल्याचा आरोप काँग्रेसचे शहराध्यक्ष रमेश बागवे यांनी केला.
‘भोसले यांनी राष्ट्रवादीचे उमेदवार म्हणून अर्ज दाखल केला. मात्र त्यांनी अर्जासोबत भाजपचा एबी फॉर्म सादर केला. त्याला आम्ही हरकत घेतली होती. त्याची सुनावणी होऊन गुणदोषांवर निर्णय घेण्यात येईल, असे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यांना कमळ या चिन्हावर निवडणूक लढविता येणार नाही, असेही जाहीर करण्यात आले. मात्र त्यानंतर हा निर्णय फिरविण्यात आला. त्यासाठी नियमांचे उल्लंघन करण्यात आले. या सर्व प्रकाराला भाजपच जबाबदार आहे. विरोधी पक्षांना वेगळा न्याय मिळत असून किरकोळ कारणांवरून त्यांचे उमेदवारी अर्ज छाननी प्रक्रियेत अवैध ठरविण्यात आले आहेत. त्यासाठी बळाचा आणि शासकीय यंत्रणेचा वापर करण्यात आला आहे. त्यामुळे या विरोधात आम्ही सर्वोच्च न्यायालयात जाणार आहोत,’ असे बागवे यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी काँग्रेसनेही प्रचार सभेत या प्रकारावरून आमदार अनिल भोसले यांना लक्ष्य केले. पक्षाचे नेते अजित पवार यांनी भोसले यांच्यावर कडक शब्दात टीका केली. ‘भोसले यांना विरोध असतानाही तो डावलून त्यांना आमदार करण्यात आले. गद्दार या शब्दालाही लाज वाटेल, असे कृत्य त्यांनी केले आहे. रेश्मा भोसले यांनी भाजपकडून उमेदवारी घेतल्याची पक्षाने गंभीर दखल घेतली आहे. याबाबत आमदार भोसले यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस बजावली असून त्याचे उत्तर आल्यानंतर कारवाईची पुढील दिशा ठरविण्यात येईल.
‘१९९२ पासून मी निवडणूक लढवित आहे. पण एवढे एकतर्फी निर्णय मी पाहिले नाहीत. अपिलाचे अधिकार निवडणूक आयोगाला नाहीत, असे सांगितले जाते. तरीही भोसले यांना भाजपचे अधिकृत चिन्ह दिले गेले. निवडणूक आयोग सत्ताधारांच्या दबावाखाली काम करते की काय, अशी शंका वाटते. निवडणूक आयोगाचे स्थान वेगळे असून त्याबद्दल आदर आहे. मात्र अधिकाऱ्यांनी सत्ताधाऱ्यांच्या दबावाला बळी पडणे, हे लोकशाहीला घातक आहे. ऑनलाईन प्रक्रियेत जाणीवपूर्वक गोंधळ निर्माण केले जात असून त्याबाबत आमचे काही उमेदवार न्यायालयात गेले आहेत,’’ असे पवार यांनी सांगितले.