पिंपरी-चिंचवडच्या राजकारणातून काँग्रेस पक्ष कमकुवत करण्याचे काम ज्या राष्ट्रवादीने केले, ज्यांनी पक्ष संपवण्याची भाषा केली, त्यांच्याशीच आघाडी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. मात्र, तसा निर्णय घेण्यापूर्वी पक्षातील सर्व कार्यकर्त्यांशी चर्चा व्हावी, अशी मागणी ‘एनएसयूआय’चे माजी प्रदेशाध्यक्ष मनोज कांबळे यांनी प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांच्याकडे केली आहे. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या १०० जागा निवडून आणू, अशी गर्जना केली आहे. मग, काँग्रेसला किती जागा सोडणार , हा प्रश्नही आघाडी करण्यापूर्वी विचारात घ्यावा, असा मुद्दा कांबळे यांनी उपस्थित केला आहे.

गेल्या १५ वर्षांच्या शहरातील राजकारणात राष्ट्रवादीने पिंपरी काँग्रेस कमकुवत केली, काँग्रेसची आजची दुरवस्था राष्ट्रवादीमुळे आहे. काँग्रेसला संपवून टाकण्याची भाषा राष्ट्रवादीचे नेते सातत्याने करत होते आणि आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीशी आघाडी करण्यापूर्वी काही गोष्टी स्पष्ट असल्या पाहिजेत. काँग्रेसच्या नगरसेवकांना, पदाधिकाऱ्यांना राष्ट्रवादीने प्रवेश देऊ नये. तटकरे यांनी राष्ट्रवादीच्या मेळाव्यात बोलताना, राष्ट्रवादीचे १०० नगरसेवक निवडून येतील, असे विधान केले. मग, काँग्रेसला किती जागा देण्याची राष्ट्रवादीची योजना आहे, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. आघाडीची चर्चा सुरू ठेवून काँग्रेस नेत्यांना गाफील ठेवण्याचे राजकारण राष्ट्रवादीकडून खेळले जात नसेल कशावरून? आघाडीचा निर्णय सर्व पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून घ्यायला हवा. याबाबतची भूमिका स्पष्ट असावी, अन्यथा नव्याने काँग्रेसमध्ये येऊ पाहणाऱ्या कार्यकर्त्यांना खीळ बसू शकते, असे कांबळे यांनी प्रदेशाध्यक्षांना निदर्शनास आणून दिले आहे.