पुणे : पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वे मार्गात विविध अडथळे येत असताना दुसरीकडे पुणे-नाशिक हरित महामार्गाचा सर्वंकष प्रकल्प आराखडा (डीपीआर) तयार करण्याचे काम सुरू झाले आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (महाराष्ट्र स्टेट रोड डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन – एमएसआरडीसी) सल्लागार कंपनीची नियुक्ती केली आहे. विशेष म्हणजे पुणे- नाशिक द्रुतगती रेल्वे मार्गापेक्षा हा महामार्ग पूर्णत: वेगळा आहे.

केंद्र सरकारच्या रेल्वे मंत्रालयाकडून पुणे-नाशिक द्रुतगती रेल्वेमार्ग बांधण्याचे प्रस्तावित आहे. या रेल्वे मार्गाची आखणी पूर्ण झाली असून केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि राज्य सरकारने त्याला मान्यता दिली आहे. तसेच या रेल्वे मार्गाच्या भूसंपादनाचे काम देखील सुरू झाले. अंतिम मान्यतेचा प्रस्ताव केंद्रीय रेल्वे मंत्रालयाकडे मंजुरीसाठी प्रलंबित आहे. या रेल्वे मार्गाला संलग्न पुणे ते नाशिक औद्योगिक द्रुतगती महामार्गाचा तांत्रिक आणि वित्तीय सुसाध्यता अहवाल तयार करणेबाबतचे आदेश राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रस्ते महामंडळाला दिले होते. त्यावरून द्रुतगती रेल्वे की महामार्ग यावरून वाद सुरू झाला होता. मात्र, जानेवारी महिन्यात महारेल्वेच्या अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत फडणवीस यांनी रेल्वे प्रकल्पाला गतीने मान्यता देणार असल्याचे जाहीर केल्यानंतर या वादावर पडदा पडला होता.

हेही वाचा >>> जिल्ह्याचा एक लाख ४७ हजार कोटी रुपयांचा वार्षिक पत आराखडा जाहीर; गेल्या वर्षापेक्षा २६ टक्क्यांनी वाढ

दरम्यान, पुणे- नाशिक हरित महामार्गाबाबत रस्ते महामंडळाने सल्लागाराची नियुक्ती करण्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू करून ती अंतिम टप्प्यात आहे. तसेच महामंडळाने या महामार्गाचा प्रकल्प आराखडा तयार करण्यासाठी स्वतंत्र सल्लागार कंपनीची नियुक्ती केली आहे. या सल्लागार कंपनीकडून आराखडा तयार करण्याचे काम सुरू आहे. पुणे हे माहिती तंत्रज्ञान, औद्योगिक आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखले जाते, तर नाशिक ही कृषी मालाची बाजारपेठ आहे. अलीकडील काळात नाशिक शहरात मोठ्या प्रमाणात आयटी कंपन्यांची स्थापना झाली आहे. या दोन्ही शहरांमध्ये लघू, मध्यम व अवजड उद्योग कारखाने, कृषी-विषयक संस्था यांचे जाळे मोठ्या प्रमाणात आहे. या सर्व बाबींचा विचार करून आणि समृद्धी महामार्ग या माध्यमातून पुण्याला जोडण्यासाठी हा महामार्ग प्रस्तावित करण्यात आल्याचे रस्ते महामंडळाकडून सांगण्यात आले.

पुणे-नाशिक हरित महामार्गाचा सर्वंकष प्रकल्प अहवाल तयार करण्यासाठी एका सल्लागार कंपनीची नियुक्ती करण्यात आली आहे. संबंधित कंपनीने कामदेखील सुरू केले आहे.

– राहुल वसईकर, अधीक्षक अभियंता, रस्ते महामंडळ

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

प्रकल्पाचा आढावा

पुणे-नाशिक हरित महामार्गाची लांबी १७८ कि.मी. असून प्रकल्पाकरिता जवळपास प्रकल्पाच्या भूसंपादनासह अपेक्षित खर्च रु. २१ हजार १५८ कोटी रुपये असेल. त्यासाठी साधारणत: २००० हेक्टर जमीन संपादित करावी लागणार आहे.